

स्थैर्य,सातारा , दि. ५ जून : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण ते कोयना संगमापर्यंतच्या नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने ७ जूनपर्यंत ही बंदी लागू केली असून, या काळात केवळ पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या योजनांना परवानगी देण्यात आली आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने नागरिकांना पाणी पुरवणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियमातील तरतुदीनुसार कोयना नदीतून शेतीसाठी आणि औद्योगिक कारणास्तव खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
जलसंपदा विभागाने पाणी उपशाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार ४ जून ते ७ जून या कालावधीत नदीतून पाणी उपसा करण्यास पूर्णपणे मनाई असेल. त्यानंतर ८ जून ते ११ जून या काळात पाणी उपसा सुरू राहील. पाण्याची एकूण उपलब्धता पाहून पुढील नियोजन केले जाणार आहे.
बंदी असलेल्या कालावधीत पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी खाजगी पाणी उपसा केल्यास तो अनधिकृत मानला जाईल. अशा नियम मोडणाऱ्या व्यक्तींचा पाणी परवाना आणि विद्युत पुरवठा एका वर्षासाठी रद्द करण्यात येईल. तसेच त्यांचे पाणी उपसा करणारे साहित्य तत्काळ जप्त करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
धरणातील पाणीसाठा सध्या अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे औद्योगिक आणि बिगर सिंचन पाणी वापरकर्त्यांनी आपले सांडपाणी थेट नदीत सोडून पाणी प्रदूषित करू नये. नदीत सोडलेले प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी सध्या अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वांनी पाणी प्रदूषण टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी.
जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती मानून सर्वांनी पाण्याची बचत करावी, असे आवाहन कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वि. बा. सानप यांनी केले आहे.
