पर्यावरणाचा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी : जिल्हाधिकारी संतोष पाटील


स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी नगरपरिषद आणि ‘रानवा’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘पाचगणी टेबललँड’ पर्यावरण संवर्धन व जनजागृतीपर कॉफी टेबल बुकचे प्रकाशन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले. मागील पिढ्यांनी येथील परिसराचे वैशिष्ट्य जतन करून ठेवले असून, यापुढेही हा वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.

या कार्यक्रमाला वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महाबळेश्वर-पाचगणी इको सेन्सेटिव्ह झोन संनियंत्रण समितीचे अध्यक्ष सुधाकर नांगनुरे, सदस्य अंकुर पटवर्धन आणि रानवा संस्थेचे उत्कर्ष घाटे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांसाठी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्यक्ष कृतीतून योगदान दिले पाहिजे. पाचगणीच्या अद्वितीय नैसर्गिक वारसा, जैवविविधता, दुर्मिळ वनस्पती आणि पक्षी यांची माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. भावी पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पाचगणीच्या टेबललँड पठारावर वनस्पती आणि प्राण्यांच्या सहा ते सात प्रजातींचा उगम झाला आहे. जगामध्ये कुठेही न आढळणाऱ्या या प्रजाती फक्त येथेच आहेत. निसर्गातील काही वनस्पतींचे सौंदर्य त्याच ठिकाणी वाढते, त्यामुळे त्यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

येथील पर्यटन व्यवसाय निसर्गाच्या याच वैशिष्ट्यांवर अवलंबून आहे. हे वैशिष्ट्य जितके चांगले सांभाळले जाईल, तितके जास्त पर्यटक येथे येतील. पर्यटकांकडून अनावधानाने निसर्गाचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना योग्य शिस्त लावण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन, वन विभाग, गाईड आणि नागरिकांची आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमानिमित्त पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पठारावर शंभर टक्के पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या बेंचचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले.

ही माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी मेहनत घेतलेले छायाचित्रकार, माहिती संकलक आणि मुद्रक यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!