राधिका रोडवरील अतिक्रमणांवर सोमवारपासून चालणार बुलडोझर; टपऱ्या व शेड हटविण्याचा प्रशासनाचा इशारा


स्थैर्य, सातारा, दि. ५ जून : सातारा शहरातील राधिका रोड परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर सातारा नगरपरिषदेकडून सोमवार, ८ जूनपासून विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाणार आहे. या भागातील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी रस्त्यालगतच्या टपऱ्या, शेड आणि फलक हटविण्यात येणार आहेत.

राधिका रोडवरील बारटक्के चौक ते मार्केट यार्ड या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अतिक्रमण हटविण्याच्या निर्णयानुसार संबंधित अतिक्रमणधारकांना यापूर्वीच नगरपरिषदेकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिसा दिल्यानंतरही अनेक ठिकाणी अतिक्रमणे अद्याप तशीच असल्याचे दिसून आले आहे.

अतिक्रमणे कायम असल्याने आता प्रत्यक्ष कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोमवारपासून नगरपरिषदेचे पथक, महसूल विभाग आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.

याबाबत सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी माहिती दिली. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विनोद जळक यांनी केले आहे.

अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे न हटविल्यास नगरपरिषदेकडून ती हटविली जातील. तसेच या कारवाईसाठी येणारा संपूर्ण खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जळक यांनी दिला आहे.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे राधिका रोडवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. या कारवाईनंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्याची शक्यता आहे.


Back to top button
Don`t copy text!