फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी जयकुमार इंगळे, डी.के.पवार, डॉ. बाळासाहेब शेंडे सौ. रेश्माताई भोसले, धनंजय पवार वगैरे.
स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामध्ये अतिवृष्टी, अवर्षण, वादळ वारे पाऊस किंवा दुष्काळ कोणत्याही संकटात आघाडीवर राहुन केलेल्या प्रयत्नातून सर्वसामान्यांना शासन यंत्रणेमार्फत योग्य दिलासा देण्यात फलटण तालुक्याने नेहमीच आघाडी घेतली आहे तथापी यावेळी आलेले कोरोना विषाणूचे संकट अत्यंत भीषण असल्याने त्याच्या प्रतिकारासाठी शासन व लोकांची एकजूट निर्माण करुन लढा उभारण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानातून हा लढा उभारण्याचे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान राबविण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी लोकांमधून स्वयंसेवक यंत्रणा निर्माण करणे व त्याची कामकाज पद्धती समजावून देणे, त्याचबरोबर अभियानाविषयी माहिती देण्यासाठी अनंत मंगल कार्यालय, फलटण येथे सोमवार दि. 14 रोजी तरडगाव, गिरवी, हिंगणगाव आणि मंगळवार दि. 15 रोजी कोळकी, विडणी, गुणवरे, साखरवाडी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, सरपंच, चेअरमन वगैरेंची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, पंचायत समिती माजी सभापती सौ. रेश्माताई भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनावर मात करण्यासाठी शासन/प्रशासन गेले सुमारे 4/5 महिने अक्षरशः रात्रंदिवस कार्यरत आहे, या आजाराविषयी माहिती देणे, त्याची लक्षणे समजावून देवून हा आजार कसा ओळखावा, त्याची बाधा होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्यावी त्यातूनही या आजाराने गाठलेच तर त्यावरील उपाय योजना त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालये साधने सुविधांनी सुसज्ज ठेवली, मात्र रुग्ण संख्या नियंत्रणात रहात नसल्याने खाजगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊन तेथे उपचाराच्या सुविधा निर्माण केल्या, गावातील शाळा, महाविद्यालयात रुग्णांची सोय केली मात्र रुग्ण संख्या वाढत असल्याने आता बाधीत रुग्णांवरील उपचाराबरोबर सदर आजार नियंत्रणात ठेवून रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी लोकांच्या सहभागातून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाची घोषणा करण्यात आली असून ते प्रभावीपणे राबवून आपले कुटुंब, आपले गाव, तालुका, जिल्हा कोरोना मुक्त करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
या अभियानांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य विषयक सर्वेक्षण करावयाचे असून हे काम अंगणवाडी सेविका, आशा वर्कर वगैरे शासकीय यंत्रणेने अत्यंत उत्तम प्रकारे केले आहे, आता दुसर्या टप्प्यात शासन यंत्रणा आणि गावातील स्वयंसेवक यांनी एकत्रीतरित्या पुन्हा एकदा सर्वेक्षण करावयाचे आहे. त्याद्वारे प्रामुख्याने प्रत्येक कुटुंबातील वृद्ध स्त्री पुरुष यांना काही आजार असेल तर त्याची प्राधान्याने नोंदणी करुन त्यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देणे, लहान मुले व कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या आजाराची माहिती घेऊन त्यांच्यावर उपचार आणि मुख्यतः कोरोनाची लक्षणे असणार्या व्यक्ती मग ते वृद्ध, तरुण, लहान मुले कोणीही असतील तर प्राथमिक लक्षणे आढळताच त्यांना कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांद्वारे बाधीत होण्यापूर्वी आवश्यक उपाय योजनांच्या माध्यमातून कोरोना मुक्त करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेऊन कोरोना मुक्तीचा हा लढा यशस्वी करावयाचा असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
श्रीमंत संजीवराजे म्हणाले, फलटण तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या विचारात घेऊन शासन, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, मराठा क्रांती मोर्चा किंवा आर्ट ऑफ लिव्हिंग सारख्या संस्था संघटना, दानशूर व्यक्ती वगैरे सर्व घटकांकडून मदतीचा अक्षरशः ओघ सुरु आहे परंतू वाढत्या रुग्ण संख्येला पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा देताना डॉक्टर्स व त्यांचे सहकारी वैद्यकीय कर्मचारी संख्या मर्यादित असल्याने पुरेसे वैद्यकीय उपचार देताना अनंत अडचणी निर्माण होत असल्याने हा आजार होणार नाही यासाठी योग्य खबरदारी घेण्याची गरज असून ते या अभियानातून यशस्वी केले पाहिजे.
प्रारंभी जयकुमार शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान व त्याची अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती देऊन गावातील गट तट दूर ठेवून एकविचाराने गावातील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण, विविध आजारावरील रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार, कोरोना संशयीत आढळल्यास त्यांना आवश्यक उपचाराद्वारे कोरोना मुक्त करण्याचा प्रयत्न आणि ते शक्य नसेल तर तालुका स्तरावर पाठवून अधिक वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देऊन संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी गावाच्या एकजुटीतून पुढे येण्याचे आवाहन जयकुमार इंगळे यांनी केले. यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच यांनी आपली मते व्यक्त केली व गावातील स्वयंसेवक किंबहुना संपूर्ण गाव एक होवून ही मोहिम यशस्वी करण्याची ग्वाही दिली.