दहा वर्षे पूर्ण झालेल्या ‘आधार’ कार्डचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२३ । मुंबई । ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य अनुषंगिक तपशील अद्ययावत केलेला नाही, अशा सर्व नागरिकांनी आधार कार्डला ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून उदयास आला आहे. विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांना आधार डाटा वैयक्तिक तपशीलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आधार कार्ड अद्ययावत करण्याची कार्यवाही करावयाची आहे. प्राधिकरणाच्या २३ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार माय आधार (My Aadhaar) (एसएसयूपी) पोर्टलद्वारे ऑनलाइन आधार कागदपत्र अद्ययावत करण्यासाठी १४ जून २०२३ पर्यंत मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधार कार्डची कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर ५० रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.uidai.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!