वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या वैचारिक बैठकीला मिळते मुक्त व्यासपीठ – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, मुधोजी महाविद्यालय फलटण येथे बुधवार, दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते झाले. ‘विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जतन करून आपल्या वैचारिक मूल्यांमध्ये व व्यक्तिमत्व विकासामध्ये भर टाकून आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्वामध्ये काळानुसार बदल करून स्पर्धेच्या युगात टिकले पाहिजे’, असा मौलिक संदेश त्यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम सर होते. या स्पर्धेसाठी १) कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी की आव्हान २) शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धन ३) वाचन संस्कृती आणि आजची पिढी ४) स्त्रीवादाचे बदलते आयाम ५) संविधान व भारताची एकात्मता ६) नाईक निंबाळकर घराण्याचे प्रागतिक विचार व कार्य या विषयांवरती विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने श्रोत्यांची मने जिंकली. महाराष्ट्र राज्यातील ९ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. प्रा. युवराज खरात, प्रा. डॉ. कल्याणी जगताप व प्रा. सुलभा घोरपडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम सर यांनी वक्तृत्व कसे असावे, ते प्रभावी कसे करावे आणि जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ‘वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड हवी’ हा कानमंत्र त्यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना दिला. या स्पर्धेतील शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लजचा विद्यार्थी संकेत कृष्णात पाटील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तर द्वितीय क्रमांक ग. ना. वझे महाविद्यालय, मुलुंडचा विद्यार्थी आळशी अभय कृष्णकांत आणि मुधोजी महाविद्यालय, फलटणची विद्यार्थिनी वैष्णवी पोपट भोसले ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम रुपये अनुक्रमे १) ५०००/- २) ३०००/- ३) २०००/- (स्वतंत्र विषयावरील विशेष पारितोषिक रुपये ३०००/-) तसेच प्रमाणपत्र आणि चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी मा. श्री. विराज लालासाहेब नाईक निंबाळकर यांच्या सौजन्याने प्राप्त झालेले चषक विजयी स्पर्धकांना प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समिती प्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले तर प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी प्रमुख अतिथी व परीक्षक यांचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सन्माननीय सदस्य मा. हेमंत रानडे, मा. डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, उपाध्यक्ष मा. शिरिषशेठ दोशी, मा. प्रा.चंद्रकांत पाटील तसेच प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर उपस्थित होते. प्रा. सौ. निलम देशमुख यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. सौ. निर्मला कवठेकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी संयोजन समितीतील सदस्य डॉ. सविता नाईक निंबाळकर, प्रा. शैला क्षिरसागर, प्रा. विशाल गायकवाड, प्रा. डॉ. अभिजित धुलगुडे, प्रा. संजय जाधव, प्रा. प्रशांत शेट्ये व प्रा. डॉ. ऍड.अशोक शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!