फलटण तालुक्यात ‘जनगणना २०२७’ ची जय्यत तयारी; यंदा पहिल्यांदाच होणार ‘स्वयं आणि डिजिटल जनगणना’!


भारताची जनगणना २०२७ अंतर्गत फलटण तालुक्यात प्रशासनाची जय्यत तयारी. १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याची सुविधा. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली माहिती.

स्थैर्य, फलटण, दि. 25 एप्रिल : संपूर्ण भारतामध्ये ‘जनगणना २०२७’ च्या प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच ‘स्वयंजनगणना’ (Self-Enumeration) आणि ‘डिजीटल जनगणना’ ही अत्यंत अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. फलटण तालुक्यात या राष्ट्रीय उपक्रमासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून, याबाबतची सविस्तर माहिती व प्रेस नोट फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.

यंदाची जनगणना ही दोन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात येत्या मे-जून २०२६ मध्ये ‘घरगणना व संसाधन गणना’ (House-Listing Operations) होणार आहे. पुढील वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचे सामाजिक, आर्थिक व लोकसंख्या विषयक तपशील नोंदविले जाणार आहेत. जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी (प्रांत) प्रियांका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांना या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

१ ते १५ मे दरम्यान करता येणार ‘स्वयंजनगणना’:

दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती स्वतःच भरता येणार आहे. या पद्धतीमुळे नागरिकांचा आणि प्रगणकांचा वेळ वाचणार असून माहिती अधिक अचूकपणे नोंदवली जाणार आहे.

स्वयंजनगणनेची प्रक्रिया :

१. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन राज्य निवडून नोंदणी (Registration) करावी. २. कुटुंब प्रमुखाचे नाव, १० अंकी मोबाईल क्रमांक व ई-मेल नमूद करावा. ३. मोबाईलवर येणाऱ्या OTP द्वारे पडताळणी पूर्ण करून पसंतीची भाषा निवडावी. ४. जिल्हा, पिनकोड, गाव/परिसर भरून नकाशावर स्वतःचे अचूक निवासस्थान निश्चित करावे. ५. घर व कुटुंबाशी संबंधित सविस्तर प्रश्नावली (एकूण ३३ प्रश्न) भरून माहिती साडर करावी. ६. अंतिम सादरीकरणापूर्वी (Final Submission) माहिती तपासून पाहता येईल. एकदा अंतिम सादरीकरण केल्यावर बदल करता येणार नाही. ७. माहिती सादर केल्यानंतर मोबाईलवर ११ अंकी ‘स्वयं-जनगणना ओळख क्रमांक’ (SE ID) प्राप्त होईल.

३३ प्रश्नांमध्ये काय विचारले जाईल?

जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ८(१) अंतर्गत प्रामुख्याने चार विभागांत ३३ प्रश्न विचारले जातील:

  • घरांची स्थिती: इमारतीचा वापर, छप्पर व भिंतींचे साहित्य, घराची स्थिती.

  • कुटुंबाची माहिती: कुटुंबातील व्यक्तींची संख्या, प्रमुखाचे नाव व लिंग, अनुसूचित जाती/जमाती माहिती, खोल्यांची संख्या.

  • उपलब्ध सोयी: पिण्याचे पाणी, प्रकाश, स्वच्छतागृह (शौचालय), सांडपाणी व्यवस्था, स्वयंपाकाचे इंधन.

  • मालमत्ता व इतर: रेडिओ, टीव्ही, इंटरनेट, संगणक, वाहने (सायकल ते कार), मोबाईल फोन आणि मुख्य धान्य.

१६ मे ते १५ जून दरम्यान प्रगणक येणार घरी:

दिनांक १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान जनगणना कर्मचारी (प्रगणक) घरोभेटी देतील. ज्या नागरिकांनी ‘स्वयंजनगणना’ केली आहे, त्यांनी आपला प्राप्त झालेला ‘SE ID’ या कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यामुळे प्रगणकांना पुन्हा माहिती घेण्याची गरज भासणार नाही. विशेष म्हणजे, यंदा प्रगणकांकडून गोळा केली जाणारी माहिती कागदावर न घेता प्रथमच ‘मोबाईल ॲप’द्वारे संकलित केली जाणार आहे.

फलटण तालुक्यात प्रशासकीय नियोजन पूर्ण:

जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी फलटण तालुक्यात ४७१ घर यादी प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. यासाठी ४६८ प्रगणक, ४७ राखीव प्रगणक, ५८ पर्यवेक्षक, ६ राखीव पर्यवेक्षक आणि ८ क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainers) यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, फलटण येथे दि. २४ एप्रिल ते ४ मे २०२६ या दरम्यान विशेष प्रशिक्षण वर्गांचे नियोजन करण्यात आले आहे.

माहिती पूर्णपणे गोपनीय राहणार:

जनगणना कायदा कलम १५ प्रमाणे जनगणनेशी संबंधित सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय असते. माहितीचा अधिकार (RTI) अधिनियमांतर्गत ती देता येत नाही किंवा कोणत्याही न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता खरी व अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!