जिंती येथील ‘श्री जितोबा विद्यालया’त माजी विद्यार्थी संघाची स्थापना; अध्यक्षपदी अनिल भोईटे तर उपाध्यक्षपदी अनिता पवार


रयत शिक्षण संस्थेच्या जिंती (ता. फलटण) येथील श्री जितोबा विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अनिल भोईटे तर उपाध्यक्षपदी अनिता पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.

स्थैर्य, जिंती, दि. 14 एप्रिल : रयत शिक्षण संस्थेचे ‘श्री जितोबा विद्यालय, जिंती’ (ता. फलटण) येथे शासनाच्या आणि संस्थेच्या ध्येयधोरणानुसार नुकतीच ‘माजी विद्यार्थी संघाची’ स्थापना अत्यंत उत्साहात करण्यात आली. या नवनियुक्त कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अनिल मच्छिंद्र भोईटे, तर उपाध्यक्षपदी सौ. अनिता दत्तात्रय पवार (पूर्वाश्रमीच्या अनिता गणपत रणवरे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या मेळाव्याची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलनाने आणि वडाच्या रोपाचे पूजन करून करण्यात आली. यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे आणि महादेवराव रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शासनाच्या आदेशानुसार स्थापना आणि मुख्य उद्देश:

महाराष्ट्र शासनाने १ ऑक्टोबर २०२५ च्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ सक्तीने स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेचा दर्जा उंचावणे, शैक्षणिक विकासात समाजाचा व माजी विद्यार्थ्यांचा थेट सहभाग वाढवणे, विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले ऋणानुबंध दृढ करणे आणि त्यांच्या यशातून सध्याच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळवून देणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध: अनिल भोईटे

पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त अध्यक्ष अनिल भोईटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याचा मुख्य उद्देश शाळा आणि माजी विद्यार्थ्यांमधील नाते पुन्हा मजबूत करून शालेय विकासाला गती देणे हा आहे. श्री जितोबा विद्यालय हे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी एका मंदिरासमान आहे. शाळेला पुन्हा तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध राहू. शाळेतून घडून बाहेर पडलेले विद्यार्थी पुन्हा शाळेकडे वळतील आणि जिंतीसह पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी यासाठी तन-मन-धनाने मदत करतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री जितोबा विद्यालय माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  • अध्यक्ष: अनिल मच्छिंद्र भोईटे

  • उपाध्यक्ष: सौ. अनिता दत्तात्रय पवार

  • सचिव: सौ. माधुरी ज्ञानेश्वर जाधव (मुख्याध्यापिका तथा पदसिद्ध सचिव)

  • खजिनदार: नंदूशेठ नामदेव शेगर

  • सदस्य: ताराचंद्र आवळे, शरदराव रणवरे, यशवंत खलाटे पाटील, नंदकुमार भोसले, सारिका खलाटे (घाडगे), विजय मोरे, ज्योती पवार (दिवेकर), सुनिता शिंदे (बाबर), रोहिणी जाधव (अहिरेकर), दिपा गुजर (चव्हाण), रवींद्र गिरी, राणी ऊर्फ वैशाली रणवरे (बळे), अलका रणवरे (कारंडे), अनिकेत रणवरे, नवनाथ रणवरे, नंदकुमार रणवरे, नितीन रणवरे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या जमदाडे, अंकुश सोळंकी, शाहीन हन्नुरे, अमोल जाधव, अर्चना सोनवलकर, मधुकर जगताप आणि घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!