उन्हाळी सुट्टीत एसटीचा प्रवास महागणार! एसटी महामंडळाकडून तिकीट दरात १० टक्के भाडेवाढ; २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ही लागणार


महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) उन्हाळी हंगामासाठी १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीत तिकीट दरात १० टक्के भाडेवाढ लागू केली आहे. तसेच प्रतिप्रवासी २ रुपये स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. 14 एप्रिल : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या किंवा पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता अतिरिक्त कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेता, १५ एप्रिल ते १५ जून २०२६ या कालावधीसाठी ‘परिवर्तनशील भाडे आकारणी’ सूत्रानुसार प्रवास भाड्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याबाबतची अधिकृत माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रकांनी दिली आहे.

कोणत्या बसेससाठी लागू होणार भाडेवाढ?

एसटी महामंडळाच्या या निर्णयानुसार, सर्वसामान्यांच्या लालपरीसह काही प्रमुख बसेसच्या तिकीट दरात ही वाढ लागू असणार आहे:

  • साध्या बसेस (Ordinary)

  • जलद बसेस (Fast)

  • रात्रसेवा साधारण बसेस (Night Service Ordinary)

या सर्व प्रकारच्या बसेससाठी उन्हाळी हंगामात १० टक्के दराने भाडेवाढ करण्यात आली आहे.

२ रुपये ‘स्वच्छता अधिभार’:

केवळ तिकीट दरातच १० टक्के वाढ केली नसून, एसटी स्थानके आणि बसेस अधिक स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने महामंडळाने आता प्रत्येक प्रवाशामागे २ रुपये ‘स्वच्छता अधिभार’ (Cleanliness Surcharge) आकारण्याचा निर्णयही घेतला आहे. हा अधिभार तिकीट दराव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे.

आगाऊ आरक्षण (Advance Booking) केलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाचा नियम:

ज्या प्रवाशांनी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीतील प्रवासासाठी आधीच आगाऊ तिकीट बुकिंग (Advance Reservation) करून ठेवले आहे, त्यांनाही या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, अशा प्रवाशांकडून त्यांनी प्रवास करतेवेळी ‘आरक्षण तिकिटाचा जुना दर’ आणि ‘नवीन तिकीट दर’ यातील फरकाची रक्कम बसमध्येच वसूल करण्यात येणार आहे.

त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघताना सोबत सुटे पैसे आणि तिकिटातील फरकाची रक्कम बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!