अजिंक्यतारा कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी मेळावे संपन्न


स्थैर्य, सातारा, दि. २ जून : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रति एकरी ऊस उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स, विटा यांच्या संयुक्त विद्यमाने सहा गटांत शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना या मेळाव्यांतून मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी ऊस शास्त्रज्ञ आणि नेचर केअरचे सुरेश माने-पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी हंगाम आणि जातीनिहाय ऊस लागवड, बियाणे निवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक खतांचा समतोल वापर, तण नियंत्रण तसेच ठिबक सिंचनाचा वापर याबाबत सविस्तर माहिती दिली.

ऊस उत्पादन वाढवण्यासाठी अजिंक्यतारा कारखाना उधारीवर ऊस बियाणे, ताग बियाणे तसेच कारखान्याच्या नर्सरीत तयार केलेल्या ऊस रोपांचे सवलतीच्या दरात वाटप करत आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात आणि पर्यायाने कारखान्याच्या गाळपात वाढ व्हावी, यासाठी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ प्रयत्न करत असल्याचे कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत यांनी सांगितले. नेचर केअरच्या सूचनेनुसार नियोजन केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल. यासाठी शेती व ऊस विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी योग्य समन्वय ठेवून पाठपुरावा करावा, असे सावंत म्हणाले.

शेतकऱ्यांनी कारखान्यावरील विश्वास दृढ करून आपण पिकवलेल्या सर्व उसाची नोंद अजिंक्यतारा कारखान्याकडे करावी आणि ऊस गाळपासाठी कारखान्यालाच पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या शेतकरी मेळाव्यांना कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, सर्व संचालक आणि शेती-ऊस विकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, अशी माहिती केन मॅनेजर आनंदराव पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!