

स्थैर्य, सातारा, दि. २ जून : सातारा जिल्ह्यात एकूण एक हजार पाचशे ग्रामपंचायती असून त्यापैकी केवळ एकोणसाठ ठिकाणी ‘आपले सेवा केंद्र’ सुरू आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये लवकरात लवकर हे केंद्र सुरू करून नागरिकांना गावातच विविध दाखले उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाटील यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीस पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने आणि जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात उपस्थित होते. तसेच उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
कृषी विभागाने राहिलेल्या शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ तत्काळ काढावेत, अशी सूचना पाटील यांनी केली. जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून धरणांमधील गाळ काढावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनगणनेच्या कामाबाबत पाटील म्हणाले, घरोघरी जाऊन केली जाणारी घरांची गणना अचूक आणि निश्चित मुदतीतच पूर्ण झाली पाहिजे. सर्व पर्यवेक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन याची पडताळणी करावी. ज्या मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे, ते लवकरात लवकर पूर्ण करावे. मतदार मॅपिंगचा टक्का आणि वेग वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
सेवा हमी कायद्यांतर्गत प्रत्येक विभागाने आपली सेवा वेळेत देण्याबाबत खबरदारी घ्यावी. शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर आणण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १४ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने कार्यवाही करावी आणि जनसुविधा तसेच नागरी सुविधांच्या कामांना गती द्यावी, असेही पाटील यांनी सांगितले.