

स्थैर्य, सातारा, दि. ८ जून : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) २०२६-२७ अंतर्गत सातारा जिल्ह्याची सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसाठी निवड करण्यात आली आहे. या पिकांसाठी ‘मूल्य साखळी भागीदार’ (Value Chain Partner – VCP) म्हणून काम करण्यासाठी इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), सहकारी संस्था आणि सार्वजनिक किंवा खाजगी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या भागीदारांमार्फत संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रात प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण आणि शेतकरी शेतीशाळा असे महत्त्वाचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
FPC आणि सहकारी संस्थांसाठी पात्रता निकष:
-
कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असावी (नोंदणी मार्च २०२३ पूर्वीची असावी).
-
जिल्ह्यात काम करण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आणि संस्थेचे किमान २०० शेतकरी सभासद असावेत.
-
मागील ३ वर्षांतील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा जास्त असावी.
-
शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये (FPC) शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा समभाग असावा.
-
सहकारी संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये तेलबिया पिकातील कामकाजाचा स्पष्ट उल्लेख असावा.
-
(कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यात कार्यरत असणाऱ्या आणि शासन अनुदानित संस्थांना प्राधान्य दिले जाईल.)
सार्वजनिक किंवा खाजगी संस्थांसाठी पात्रता निकष:
-
संस्थेची किमान वार्षिक उलाढाल १० कोटी रुपये असावी.
-
गेल्या ३ वर्षांत संस्थेचे कोणतेही कर चुकलेले किंवा थकीत नसावेत.
-
बियाणे, खते किंवा खाद्यतेल उत्पादक म्हणून किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असावा.
लाभ आणि अर्ज प्रक्रिया:
-
आर्थिक सहाय्य: निवड झालेल्या मूल्य साखळी भागीदारांना समूहामध्ये बियाणे वितरण आणि प्रशिक्षणावर झालेल्या एकूण खर्चाच्या १.५% रक्कम ‘व्यवस्थापन सहाय्य निधी’ म्हणून दिली जाईल.
-
अर्ज कसा करावा: निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक संस्थांनी सोयाबीन व भुईमूग पिकांसाठी स्वतंत्रपणे, आवश्यक कागदपत्रे आणि संचालक मंडळाच्या ठरावासह कंपनीच्या लेटरहेडवर तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत.
-
लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मार्गदर्शक सूचनांनुसार गुणांकन करून अंतिम निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी संस्थांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
