बसाप्पा पेठेतील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाई, पालिकेने केली धडक कारवाई


स्थैर्य, सातारा, दि. ९: राजकीय दबावामुळे फार्स ठरलेल्या बसाप्पा पेठेतील टपर्‍यांच्या अतिक्रमणाचा प्रश्‍न पालिकेने धसास लावला. जुन्या सेनॉर हॉटेल चौकातील गट ई खोक्याचा अपवाद वगळता बंद टपर्‍याची सर्व अतिक्रमणे हटविली.
जुन्या सेनॉर हॉटेल चौकातील टपर्‍यांचे अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने काही दिवसा पूर्वी  पोलिसांच्या बंदोबस्तासह मोठी तयारी केली मात्र राजकीय दबावामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाव कारवाईचा केवळ फार्स झाला. मात्र सोमवारी पालिकेने धडक कारवाई करत बसाप्पा पेठेच्या सेनॉर चौकातील तब्बल सहा बंद टपर्‍या हटविल्या.
अतिक्रमण हटाव पथकाचे प्रशांत निकम दहा कर्मचार्‍यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. जेसीबीने सर्व टपर्‍या मुळापासून उखडण्यात आल्या. गट ई खोक्याचा अपवाद वगळता बंद टपर्‍यांचे अतिक्रमण असल्याने बसाप्पा पेठेतून करंजेत जाणार्‍या रस्त्याने मोकळा श्‍वास घेतला. टपरीधारकांनी आधी काही काळ वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासनाच्या परखड भूमिकेमुळे नंतर त्यांचा विरोध मावळला. या कारवाईत सर्व टपर्‍या पालिकेने जप्त केल्या.
या चौकालगतच्या अंर्तगत रस्त्यावर पालिकेची मोकळी जागा असून येथून अंर्तगत कॉलन्यांना जाणारा रस्ता वीस फुटाचा आहे. या रस्त्यावर एका महिलेने बेकायदेशीर रित्या शेड उभारल्याची पेठेतील नागरिकांची मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे लेखी तक्रार होती. या शेडलगतच्या शौचालयाचे सांडपाणी रस्त्यावर सोडून देण्यात आल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या शेडच्या अतिक्रमणावर मात्र पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिक आश्‍चर्य व्यक्त करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!