पुण्यात कारवाई सुरू! करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्याने खानावळ ‘सील’


स्थैर्य, पुणे, दि २०: शहरात करोना रूग्णांची वाढ होत असताना; महापालिकेने घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यावसायिक अस्थापनांची तपासणी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.

या तपासणीत शनिवारी सदाशिव पेठ मधील एका खानावळीत कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आल्याने ही खानावळ सील करण्यात आली आहे. स्वप्नील खानावळ असे या खानावळीचे नाव असून संबधित खानावळीच्या मालकाकडून पाच हजार रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

शहरात करोनाचे रूग्ण वाढत असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून तीन दिवसांपूर्वी महापौर तसेच महापालिका आयुक्तांकडून सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली आहे, या बैठकीत शहरातील गर्दी होणाऱ्या व्यावसायिक अस्थापनांची तपासणी करून करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

याची तपासणी करत असताना कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयास सदाशिव पेठ येथील स्वप्नील खानावळीत ग्राहकांमध्ये कोणतेही सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे, खानावळीच्या प्रवेश द्वारावर सॅनिटायझर नसणे, ग्राहकांची थर्मल गन द्वारे तपासणी न करणे, ग्राहकांच्या नावाच्या नोंदणी रजीस्टर न ठेवणे या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर या खानावळ मालकाकडून 5 हजार रूपयांचा दंड वसूल करून ही खानावळ सील करण्यात आली. वरिष्ठ आरोग्य निरिक्षक सुनील मोहीते, आरोग्य निरिक्षक रविराज बेंद्रे, मोकादाम रविंद्र कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Back to top button
Don`t copy text!