सातारा-कोल्हापूरला तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवणार


 

राजेश टोपे यांची माहिती : रिकव्हरी रेट वाढवणे व मृत्यूदर कमी करन्यावर भर

स्थैर्य, कराड, दि. 9 : राज्यातील करोनाचा रिकव्हरी रेट वाढवणे व मृत्यूदर कमी करन्यावर शासनाचा भर आहे. यासाठी जास्तीत जास्त निकट सहवासीतांचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा रेथे उद्यापासून टेस्टींग लॅब सुरू केली जाणार असून येथील जिल्हा आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराबाबत लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्या आहेत. त्याअनुषंगे नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सातारा आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील करोना बाधितांचा रेट कमी करण्याच्या अनुषंगाने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पाठवण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

येथील करोनासंदर्भातील आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. राजू आवळे, आ. शशिकांत शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय भागवत, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख उपस्थित होते.

ना. राजेश टोपे म्हणाले, सध्या करोना पॉझिटिव्ह रूग्णांचा वाढता रेट कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. यासाठी निकट सहवासीतांच्या तपासावर अधिक भर दिला आहे. टेस्ट मोठ्या प्रमाणवर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्टीजेन टेस्ट तसेच आरटीपीसीआरची टेस्ट वाढवल्या आहेत. आजपासून सातारा रेथे आरटीपीसीआरची नवीन लॅब सुरू करण्यात येत आहे. तिचे काम उद्यापासून सुरू होईल.  करोना बाधितांचा रिपोर्ट 24 तासाच्या आतच आला पाहिजे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. संख्या वाढणे हा काळजीचा विषय आहे मात्र, रिकव्हरी रेट वाढणे आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी लवकर निदान करण्यासाठी निकट सहवासीतांचा शोध घेणे महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील मृत्यूदर वाढू नये यासाठी राज्य शासनाकडून सर्वाधिक काळजी घेण्यात येत आहे. खासगी हॉस्पिटल नॉन कोव्हिड रूग्णांना करोनाची टेस्ट झालयशिवाय त्यांच्यावर उपचार करत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. असे रूग्ण तपासताना त्या रूग्णाची अ‍ॅन्टीजेन टेस्ट करावी, या टेस्टचा रिपोर्ट तात्काळ मिळतो. मात्र, त्यांनी कोणत्याही रूग्णाला नाकारू नये. असे कोणतेही हॉस्पिटल करत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या हॉस्पिटलवर करवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ते म्हणाले, खासगी हॉस्पिटलसाठी 80 टक्के बेड कोव्हिड रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातीला रिक्त जागा तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील जागा भरण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून ही भरती तात्काळ करण्यात येणार आहे. त्यासाठी मेरीट हाच निकष लावला जाणार असल्याचेही ना. राजेश टोपे यांनी सांगितले.

 

राज्यासाठी नवीन 500 रूग्णवाहिका

राज्यातील डोंगर दुर्गम भागात करोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता येथील रूग्णांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी रूग्णवाहिकांची गरज असल्याचे दिसून आले आहे. शिवार तशी मागणी लोकप्रतिनिधींकडूनही होत आहे. याचा विचार करून तातडीने नवीन पाचशे रूग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सातारा येथील जिल्हा रूग्णालयातील अनागोंदी कारभाराविषयी काही प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. मग ते सर्जनचे असोत अथवा येथे काम करणाऱ्या डॉक्टरचे असोत. यासाठी जिल्हा रूग्णालयाचे मोठे ऑपरेशन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या केल्या जाणार आहेत. तसेच येथे नेतृत्व बदलाचा निर्णय घेण्यात  आला आहे.

करोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना खासगी हॉस्पिटलमधून लाखोरूपयांची बिले केली जात आहेत. याबाबत आलेल्या तक्रारी व केलेल्या पाहणीनंतर कोव्हिड रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचाराच्या बिलावर एका विशिष्ट पातळीवर मर्यादा  घालण्यात आली आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या  निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यापेक्षा कोणी जादा बिल आकारणी करत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी भरारी पथक नेमण्यात आली आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!