कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२३ । पुणे । राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची आज महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल, असे कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी जाहीर केले.

बैठकीस कृषि आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट, कृषि संचालक दिलीप झेंडे, रविंद्र भोसले, सुभाष नागरे, विकास पाटील, दशरथ तांभाळे, महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे कार्यकारी समिती अध्यक्ष डॉ. व्यंकटराव मायंदे, कोषाध्यक्ष डॉ. रामकृष्ण मुळे, पूर्वाध्यक्ष डॉ. राजाराम देशमुख, महासचिव डॉ. सुदाम अडसूळ, माजी सनदी अधिकारी डॉ. कृष्णा लव्हेकर आदी उपस्थित होते.

जागतिक हवामानबदलाचे परिणाम पाहता आपल्याला कृषि विकासासाठी वेगवेगळ्या घटकांचे विचार घेणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. सत्तार यावेळी म्हणाले, धोरणात्मक बाबींमध्ये कृषि विभागामार्फत कृषि तंत्रज्ञ, या क्षेत्रातील अभ्यासक आणि शेती घटकावर परिणाम करणाऱ्या विभागांचे विचार घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषि विभाग, हवामान विभाग, कृषि विद्यापीठ, विभागाचे आजी माजी अधिकारी, तसेच विविध या क्षेत्रातील तज्ज्ञ यांची कार्यशाळा घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी कृषि विभागाशी ज्ञान भागीदारीसाठी महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्था उत्सुक असल्याचे यावेळी उमाकांत दांगट यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुदाम अडसूळ, डॉ. मायंदे यांनी संस्थेविषयी तसेच संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!