धोम – बलकवडीचा कालवा बारमाही वाहण्यासाठी महाबळेश्वर तालुकयातील सोळशी येथे नवे धरण उभारणार : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२३ | फलटण | फलटण तालुक्यातून जात असलेला धोम – बलकवडीचा कालवा हा नीरा देवधरच्या प्रकल्पामुळे आठमाही कार्यन्वित असणार आहे. तर आगामी काळामध्ये धोम – बलकवडीचा हाच कालवा बारमाही वाहण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी येथे नव्याने धरण उभारणार आहोत. यासाठी केंद्र व राज्य सरकार अनुकूल असून आगामी काळामध्ये याबाबतचा अंतिम अहवाल सादर होणार आहे, अशी माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहाध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले कि, मी कोणताही जल तद्न्य नाही किंवा भूगोल तद्न्य नाही परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याला जेवढे कळते तेवढेच मला कळत आहे. आपल्या तालुक्यातील नागरिकांना अतिरिक्त पाणी मिळण्यासाठी आपण आता कार्यरत राहणार आहोत. नीरा – देवधर प्रकल्प मार्गी लागल्याने आगामी काळामध्ये नक्की तुम्हाला काय हवे आहे ? असा प्रश्न उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मला विचारला होता; त्यावर त्यांना अभ्यास करून सदरील प्रकल्पाची मागणी आपण केली आहे. आणि हा अभ्यास मी केला नसून राज्यातील जे जलतज्ञ आहेत त्यांनी केला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी येथे हे धरण उभारून त्याचे पाणी धोम – बलकवडीच्या माध्यमातून आपण फलटण, कोरेगाव व माण – खटाव तालुक्यात नेहणार आहोत.

आता पाणी वाटपाच्या असलेल्या लवादानुसार आपण एक ते दोन टीएमसीचे धरण जर बांधले तर त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. लवादानुसार आपण हे धरण प्रस्तावित केले आहे. नीरा – देवधर प्रकल्प ज्या प्रमाणे धूळ खात एका कोपऱ्यात पडला होता त्याच प्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी येथील असणाऱ्या धरण प्रकल्पाची फाईल हि धूळ खात पडली होती; आपण ती फक्त पुढे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा धरण प्रकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल, अशी खात्री खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

फलटण शहरामधून जो पालखी महामार्ग जाणार आहे; त्याचे काम येणाऱ्या काही महिन्यात सुरु होईल व निर्धारित वेळेपूर्वीच ते काम पूर्ण होणार आहे. शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाबाबत काही अफवा मुद्दामुन पसरवल्या जात आहे; परंतु आहे हाच मार्ग मोठा न होता आहे आहे एवढाच राहणार आहे. त्याचे फक्त काँक्रीटीकरण व मजबुतीकरण होणार आहे. मला जनतेने निवडून दिले आहे; आणि मला जनतेतूनच मला निवडून जायचं आहे. लोकसभा व विधानसभा यामध्ये निवडून आलेल्या लोकप्राधिनिना जनतेची कामे करावी लागतात. विधान परिषद किंवा राज्यसभेत गेल्यावर पक्षाचे काम करण्याची गरज असते जनतेची कामे केली नाहीत तरी कोणीही विचारात नाही, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!