‘सावित्री’च्या लेकींचा ऐतिहासिक एल्गार! फलटणमधून ५००० महिलांनी नायगावात टेकला माथा; १०० एसटी बसेसमधून घडले शक्तीप्रदर्शन


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी फलटणमधून तब्बल ५००० महिलांनी नायगाव (खंडाळा) येथे जाऊन अभिवादन केले. बापूराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० एसटी बसेसमधून हा विराट ताफा नायगावात दाखल झाला होता.

स्थैर्य, फलटण, दि. ०४ जानेवारी : देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती काल (दि. ३) सर्वत्र साजरी झाली. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून फलटण तालुक्यातील महिलांनी एक नवीन इतिहास रचला. सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथे अभिवादन करण्यासाठी फलटणमधून काल तब्बल ५००० महिलांचा जनसागर लोटला होता. १०० एसटी बसेसच्या ताफ्यातून या महिलांनी नायगाव गाठत सावित्रीबाईंना मानवंदना दिली.

महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे प्रमुख बापूराव शिंदे यांनी या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही दरवर्षी फलटण तालुक्यातून शेकडो महिलांना नायगाव येथे घेऊन जातो. मात्र, यंदा महिलांचा उत्साह अभूतपूर्व होता. काल, ३ जानेवारी रोजी तब्बल ५००० महिला या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांना नायगाव येथे नेण्यासाठी १०० एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन नायगावला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

ग्रामीण भागातून उस्फूर्त प्रतिसाद

फलटण येथील ‘क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती उत्सव समिती’ आणि ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती उत्सव समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये विडणी, फरांदवाडी, तरडगाव, बरड, गुणवरे, जाधववाडी, चौधरवाडी, वाठार निंबाळकर, वडजल, कोळकी, आंदरूड या गावे आणि फलटण शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

काल सकाळी या उपक्रमाची सुरुवात फलटण येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथून झाली. येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांनी अभिवादन केले. त्यानंतर हा ५००० महिलांचा ताफा फलटण – निंभोरे – सुरवडी – तरडगाव – लोणंद मार्गे नायगाव येथे पोहोचला. नायगाव येथे दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती, मात्र शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!