साताऱ्यातील १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ; ९ व १० मे रोजी रंगणार साहित्य सोहळा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

साताऱ्यात ९ व १० मे रोजी होणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलनाचे उद्घाटन ‘जेएनयू’च्या प्राध्यापिका आणि आदिवासी हक्क कार्यकर्त्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २२ एप्रिल : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) प्राध्यापिका, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची साताऱ्यात होणाऱ्या १५ व्या ‘विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलना’च्या उद्घाटक म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ. भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ‘प्रतिसरकार’ला अभिवादन

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त साताऱ्याच्या ऐतिहासिक प्रतिसरकारला अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात आगामी दि. ९ आणि १० मे रोजी हे १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

  • संमेलनाध्यक्ष : महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर संभाजी भगत.

  • स्वागताध्यक्ष : ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे.

कोण आहेत प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ?

संमेलनाच्या उद्घाटक म्हणून उपस्थित राहणाऱ्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ या मूळच्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहेत. त्यांचे कार्य आणि शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे:

  • २००५ पासून त्या ‘जेएनयू’, नवी दिल्ली येथे स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टीम्स सायन्स विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

  • त्यांनी चेन्नईत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ‘जेएनयू’मधून संगणक विज्ञान विषयात एम.फिल आणि पीएच.डी. पूर्ण केली आहे. तसेच, ‘आयआयटी कानपूर’मधूनही त्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे.

  • मे २०२० ते जून २०२३ या काळात त्यांनी झारखंडमधील दुमका येथील ‘सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या’ कुलगुरू म्हणून यशस्वीरीत्या कार्यकाळ पूर्ण केला आहे.

  • युनेस्कोचा (UNESCO) बहुमान: विशेष म्हणजे, जून २०२५ मध्ये युनेस्कोच्या ‘आदिवासी हक्क’ समितीच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली असून, हा जागतिक स्तरावरील बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

“आदिवासी समाजातील उच्चशिक्षित व तरीही आदिवासी हक्कांसाठी झटणाऱ्या प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथील १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून झालेली निवड ही नक्कीच विद्रोही चळवळीला मोठे बळ देणारी ठरेल,” असा ठाम विश्वास संयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. डॉ. सुहास महाराज फडतरे व कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button
Don`t copy text!