“ठाकरे गटाचे १३, राष्ट्रवादीचे २० आमदार, तर काँग्रेसचे बडे नेते CM एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२३ । मुंबई । आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राज्याचे राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच महाविकास आघाडी आणि सत्ताधारी नेते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. सर्वोच्च न्यायालय आपल्या बाजूने निकाल देईल, असे दोन्ही गटांना वाटत आहे. मात्र, निकालविरोधात गेला तर त्याची जुळवाजुळव शिंदे गट आणि भाजपकडून सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता ठाकरे गटाचे १३ आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की,  अशा अनेक चर्चा आहेत. ठाकरे सेनेतील उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे २० आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत. महाबळेश्वर येथे अनेक काँग्रेस नेते एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या चर्चाही आहेत. अशा अनेक चर्चा सुरु आहेत. चर्चा भरपूर होऊ शकतात. मात्र, ते सत्यात उतरले पाहिजे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

जगातील एकही विद्वान खासदार महोदयाच्या स्पर्धेत नाही

उदय सामंत यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. जगातील सगळ्यात विद्वान आणि शहाणे ते असल्यामुळे त्यांच्याबाबत बोलणे सोडून दिले आहे. जगाच्या पातळीवर असा एकही विद्वान शिल्लक राहिलेला नाही की जो त्या खासदार महोदयांच्या स्पर्धेत असेल. सगळ्यांना क्रॉस करून सगळ्यांच्या पुढे जाऊन देशाचे महाविद्वान ते बनलेले आहेत. म्हणून ते सगळ्यांची अक्कल काढतात. जगातील सगळ्या विद्वानांपेक्षा त्यांना अक्कल जास्त आहे, त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायचे, अशी खोचक टीका उदय सामंत यांनी केली.

दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचक विधान केले आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेतील. निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंतच्या काळात काहीही घडू शकते, असे सूचक विधान त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!