
दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२६ | फलटण |
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत BSNL ऑफिसशेजारील फलटण नगर परिषदेच्या सभागृहामध्ये वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
या सभांमध्ये संबंधित प्रभागातील गैरहजर, स्थलांतरित, मयत व दुबार (ASDD) मतदारांची भागनिहाय यादी वाचून दाखविण्यात येणार असून, नागरिकांकडून प्राप्त होणार्या माहितीची नोंद घेण्यात येईल. त्यानंतर संबंधित BLO मार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच प्रत्येक प्रभागातील ASDD मतदारांची यादी भागनिहाय तयार करण्यात आलेली असून, मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.
फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या प्रभागातील वॉर्ड सभेस उपस्थित राहून SIR अभियानाबाबत मतदार यादी शुद्धीकरणाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.
अचूक व अद्ययावत मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी व BLA यांनी वॉर्ड सभेला उपस्थित राहून या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे.