तावडी येथील शिवांजली भोसले हिची ‘ड्रग इन्स्पेक्टर’पदी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२६ | फलटण |
तावडी, ता. फलटण येथील रहिवासी रणधीर भीमराव भोसले व सौ. शालिनी रणधीर भोसले यांची कन्या कु. शिवांजली हिची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत सन २०२५-२६ सालातील घेण्यात आलेल्या ड्रग इन्स्पेक्टर पदासाठीच्या परीक्षेद्वारे निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल तिचा क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे, फरांदवाडीचे ज्येष्ठ नेते शिंदे यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला.

शिवांजलीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा तावडी या ठिकाणी झाले तर माध्यमिक शिक्षण वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल फलटण येथे झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण या ठिकाणी पूर्ण केले असून बी. फार्मसीचे शिक्षण गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज, कराड येथून झाले आहे. शालेय विद्यार्थी जीवनापासून शिवांजली वादविवाद वक्तृत्व स्पर्धा, डान्स स्पर्धा, क्रिडा स्पर्धा यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारी हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे.

अभ्यासात अतिशय चाणाक्ष व हुशार, शिक्षकप्रिय विद्यार्थिनी म्हणून आजही तिचा शिकलेल्या शाळांमध्ये उल्लेख केला जातो. शिवांजलीचे वडील रणधीर भोसले हे शेतीव्यवसाय व सामाजिक कार्यकर्ते असून मानवी हक्क संरक्षण संघटनेचे कार्यकर्ते आहेत.

शिक्षणाचे महत्त्व तिला तिच्या आई-वडील व तिचे मामा यांच्याकडून मिळाल्याचे ती अभिमानाने सांगते.

तिची आई उच्चशिक्षित (एम.ए., डी,एड्.) असून लहानपणापासून आईने अभ्यासाव्यतिरिक्त विविध समाजसुधारक व गुरुजनांचे शिक्षणविषयक विचार याविषयी माहिती देऊन ज्ञान वाढवण्याचे कार्य केल्याचे शिवांजली आवर्जून सांगते.

प्राथमिक ते माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना फलटण परिसरातून खूप काही शिकायला मिळाले. त्याच्या जोरावरच भरपूर अभ्यास करून हे यश मिळवले, असे तिने सांगितले.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर नितांत प्रेम असणारी शिवांजली असून ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ तसेच ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मला कायम प्रभावित करतो व त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले, असे शिवांजलीने बोलताना सांगितले.

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघ फलटण तालुका अध्यक्ष अमोल आढाव यांची शिवांजली भाची ऊुन गुणवरे गावातील आजी-आजोबा यांच्याकडून शैक्षणिक विचारांचे बळ मिळाल्याचे विचार तिने विचार व्यक्त केले.

ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र राज्यातून ओपन मेरिट लिस्टमधून ३८ व्या रँकने व मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान शिवांजलीने मिळवला आहे. कमी वयात राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करण्याचे काम शिवांजली भोसले हिने केलेले आहे.

शिवांजली भोसले हिच्या यशाबद्दल तिचे फलटणसह बारामती, सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणच्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!