

स्थैर्य, सातारा, दि. ११ : सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या १५ व्या ‘विद्रोही साहित्य संस्कृती संमेलना’चा समारोप नुकताच पार पडला. या समारोपीय सत्रात किल्ले अजिंक्यताऱ्यावर थोरले छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारण्यासह अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि राजकीय ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
संमेलनात एकमताने मंजूर झालेले प्रमुख ठराव :
-
किल्ले अजिंक्यताऱ्यावर स्मारक: किल्ले अजिंक्यताऱ्यावर थोरले छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांचा भव्य पुतळा व स्मारक उभे करावे.
-
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा: कर्ज काढून आणि शेतकऱ्यांवर लादून केला जाणारा ‘शक्तीपीठ महामार्ग’ त्वरित रद्द करण्यात यावा.
-
मुंबई विद्यापीठाचा नामविस्तार: मुंबई विद्यापीठाला ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचे नाव द्यावे.
-
शनिवारवाड्यावर पुतळे: पुण्यातील शनिवारवाड्यासमोर महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे भव्य पुतळे उभारावेत. तसेच, शनिवारवाड्यात छत्रपती शाहू महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा उभा करावा.
-
प्रतिसरकारचे स्मारक: साताऱ्यात ‘प्रतिसरकार’चे (पत्री सरकार) यथायोग्य स्मारक उभे करावे.
-
पंढरपूर महापूजा: पंढरपूरच्या मंदिरातील महापूजेत ‘पुरुषसूक्त’ काढून त्याऐवजी वारकरी संतांचे अभंग वापरावेत.
-
शाळा बंद विरोधी आंदोलन: शासनाच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात आंदोलन करणे.
-
स्मारकांचे काम पूर्ण करावे: साताऱ्यातील भीमाबाई आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहत्या घराबाबत शासनाने लक्ष घालून हे स्मारक लवकर पूर्णत्वास न्यावे.
-
निषेध: छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीबद्दल लेखक विश्वास पाटील यांचा जाहीर निषेध.
-
भारतरत्न पुरस्काराची मागणी: महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा. तसेच किल्ले संवर्धनात किल्ल्यांच्या इतिहासाला महत्त्व देण्यात यावे.
‘महाराष्ट्रात विद्रोहीचे वादळ घोंघावताना दिसेल’
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना इशारा दिला.
“संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला आता निवडणुकीत लक्ष घालावेच लागेल. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात विद्रोहीचे वादळ घोंघावताना दिसेल.” – कॉ. धनाजी गुरव
मान्यवरांची उपस्थिती
या समारोपीय कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत, १४ व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कवी वाहरू सोनवणे, सह-स्वागताध्यक्ष सुहास महाराज फडतरे, कॉ. धनाजी गुरव, अविनाश कदम, ॲड. वर्षा देशपांडे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. डॉ. रवींद्र चव्हाण, विजय मांडके, प्रा. गौतम काटकर यांच्यासह विद्रोही चळवळीचे कार्यकर्ते आणि साहित्याप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.