स्थैर्य, सातारा, दि. ९: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग ऑस्ट्रेलियाच्या टी-२० लीग बिग बॅशमध्ये खेळू शकतो. युवीचा व्यवस्थापक जेसन वॉर्नने म्हटले की, सर्व काही योग्य पद्धतीने झाल्यास लीगमध्ये खेळणारा युवराज पहिला भारतीय पुरुष खेळाडू बनू शकतो. मंधाना, जेमिमासह अनेक महिला खेळाडू बिग बॅशमध्ये खेळल्या आहेत. ३ डिसेंबर ते ६ फेब्रुवारीदरम्यान लीगचे दहावे सत्र होईल. भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये न खेळण्याचे मुख्य कारण बीसीसीआय खेळाडूंना परवानगी देत नाही. भारतीय मंडळ आपल्या खेळाडूंना भारतीय टीम व आयपीएलमधून निवृत्त होत नाही, तोपर्यंत परवानगी देत नाही. ३८ वर्षीय युवराज सिंगचा व्यवस्थापक जेसन वॉर्नने म्हटले, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताच्या स्टार खेळाडूला लीगमध्ये घेण्यास उत्सुक आहे. आम्ही सीएसोबत त्यावर काम करत आहोत.’