साहित्यिकांनी वास्तवतेचे भान ठेवून लिखाण करावे – राहुल निकम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३० जानेवारी २०२४ | फलटण |
जे आपल्या आसपास घडते, त्यावर लक्ष ठेवून अचूक शब्दरूपाने भाष्य केले पाहिजे. जे समाजाच्या उपयोगी आहे त्याला मूल्य असले पाहिजे. साहित्यिकांनी आपले अनुभव ज्या भाषेत घेतले आहेत, त्याच भाषेत लिखाण असावे, यामुळे ती साहित्यकृती काळजाला भिडते व जनमानसात ठसा उमटविते. अशी पुस्तके बाजारात आली तर वाचकवर्ग आपोआप त्याकडे आकर्षित होतो. लिखाण आशयसमृद्ध असेल तर ते पुस्तक बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जाते. त्याच्या आवृत्त्या काढाव्या लागतात. त्यामुळे साहित्यिकांनी वास्तवतेचे भान ठेवून लिखाण करावे, असे मत नियत वनक्षेत्र अधिकारी रानकवी राहुल निकम यांनी व्यक्त केले.

साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वनविभाग फलटण यांनी फलटण येथील नाना-नानी पार्क येथे आयोजित केलेल्या अकराव्या साहित्यिक संवाद कार्यक्रमात निकम बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, अ‍ॅड. आकाश आढाव, लेखिका सौ. सुलेखा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल निकम पुढे म्हणाले की, वाचनातून लिखाणास प्रेरणा मिळते. त्यामुळे पुस्तकांबरोबर माणसे व त्यांचे जीवन वाचायला शिकले तर दर्जेदार साहित्य निर्माण होईल. वाचक वर्ग कमी नाही तर त्यांना वाचनाची गोडी लागावी अशी पुस्तके आज त्यांच्या हातात मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याचे भान साहित्यिकांनी ठेवले पाहिजे.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे म्हणाले की, साहित्यिक संवाद कार्यक्रम ऊर्जा देणारा व नवप्रेरणा देऊन जाणारा आहे. नवसाहित्यिकांनी वाचन अधिक करावे व समर्पण भावनेने लिखाण करावे.

लेखिका सौ. सुलेखा शिंदे म्हणाल्या की, वाचन ही कला आहे. आपण कसे वाचन करतो त्यावर आकलन अवलंबून असते. त्यामुळे मनशांती असताना वाचन करून त्याच्या टिपणी काढाव्यात.

यावेळी संजय पांचाळ व ज्ञानेश्वर कोरडे यांनीही साहित्यविषयक आपली मनोगते व्यक्त करताना साहित्यिक संवादाची कशी गरज आहे, यावर भाष्य केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी करून आपले साहित्यविषयक अनुभव कथन करून आपली साहित्यिक वाटचाल कशी असावी, यावर भाष्य केले.

आभार लेखक अ‍ॅड. आकाश आढाव यांनी मानले. यावेळी साहित्यिक संवाद कार्यक्रमास फलटण तालुक्यातील अनेक लेखक, कवी, वाचक व साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!