नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत रहा – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड

महसूल सप्ताहानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विविध कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । औरंगाबाद । महसूल विभाग राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणारा विभाग आहे. नागरिकांना पारदर्शक, तत्परतेने आणि कालबद्धरितीने सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यरत रहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल सप्ताहानिमित्त आज वृक्षारोपण तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमानंतर विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांनी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी  अतिरिक्त आयुक्त अविनाश पाठक, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब बेलदार, उपायुक्त सर्वश्री. पराग सोमण, जगदीश मिनियार, डॉ. अनंत गव्हाणे, नगरविकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती ॲलिस पोरे, डॉ.भारत कदम उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले, नागरिक महसूल विभागाकडे शासन या भावनेने पाहतात. नागरिकांचे महत्वाची कामेही महसूल विभागाकडे असतात. त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या शेतकरी, शेतमजूर तसेच प्रत्येक नागरिकाचे काम प्राधान्याने करा, त्यात कोणत्याही प्रकारे हयगय करू नका. आपल्याकडे आलेला प्रत्येक नागरिक आपले काम झाले या समाधानाने परत जाईल याची काळजी महसूल यंत्रणेतील प्रत्येकाने घ्यावी.

गावपातळीवरील कोतवाल ते मंत्रालयीन पातळीवरील यंत्रणेपर्यंतच्या प्रशासकीय व्यवस्थेत अमूल्य घटक असतात, अनेक वर्षात या घटकांची बांधणी होते. प्रशासकीय कामकाजातील या घटकांचे योगदान महत्वाचे असते. आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाला पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची असते. आपण ज्या कार्यालयात काम करतो, त्या कार्यालयाचे वातावरण आनंददायी, स्वच्छ, रेकॉर्ड व्यवस्थित व कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सौजन्यांची वागणूक द्यावी. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवणूकीसाठी काम करा तसेच नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे. शासनाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिलेल्या सेवांमध्ये सातत्य ठेवावे, असेही ते म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त श्री. पाठक यांनी संगणकीय डेटा कसा जतन करता येईल व बदलत्या तंत्राचा आपल्या कामकाजात कसा उपयोग करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

अतिरिक्त आयुक्त श्री. बेलदार यांनी  महसूल विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती देत शालेय विद्यार्थ्यांना विविध शिबिरांच्या माध्यमातून दाखले उपलब्ध करून देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आवाहन केले.

उपायुक्त डॉ.गव्हाणे यांनी कामाचे बदलते स्वरूप लक्षात घेत विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्याबाबत माहिती दिली.

उपायुक्त श्री. सोमण यांनी १ ते ७ ऑगस्ट  या कालावधीत सातही दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. या कालावधीत महसूल दिन साजरा करण्यासह महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.  आरोग्य तपासणी शिबिराचा महसूल यंत्रणेतील अधिकारी तसेच कर्मचारी यांनी लाभ घेतला. यावेळी महसूल यंत्रणेतील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!