तरडगावला उड्डाणपुलाचे काम सुरू

पुलाची उंची 30 फुटापर्यंत वाढविण्याची नागरिकांची मागणी


दैनिक स्थैर्य । 19 मे 2025। सातारा । लोणंद-फलटण महामार्गावर तरडगाव (ता. फलटण) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून, तो पूल गैरसोयीचा ठरत आहे. त्याची किमान 30 फुटांपर्यंत उंची वाढवावी, अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, की तरडगाव हे पंचक्रोशीतील बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील प्रमुख गाव आहे. या गावातून जाणार्‍या लोणंद-फलटण रस्त्यावर सध्या बांधकामस्थित साकारला जाणारा पूल ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा तयार केला जात आहे. वास्तविक पाहता गावची लोकसंख्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावाचा झालेला विस्तार या कुठल्याही गोष्टीचा विचार केलेला दिसून येत नाही.

गावच्या दक्षिण दिशेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तरेस वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज त्यामुळे दोन्ही दिशांनी विद्यार्थ्यांची दिवसभर ये-जा असते. गावातील लोक दक्षिणेस वास्तव्यास आहेत. गावातील बर्‍यापैकी बागायती क्षेत्र रस्त्याच्या उत्तरेला आहे. त्यामुळे हा रस्ता ओलांडूनच लोकांना, शेती कामासाठी जाणार्‍या वाहनांना, ट्रॅक्टर, बैलगाडीने ये-जा करावी लागते. पंचक्रोशीतील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असल्याने सर्वांना रस्त्याचा वापर करावा लागतो.

सध्या गावालगत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम अत्यंत चुकीचे, अतांत्रिक व अवैज्ञानिकपणे चालू आहे. सध्या बांधकामस्थित असलेल्या पुलापेक्षा रस्त्याच्याखालून अलीकडे आणि पलीकडे जाण्यासाठी मोठा पूल होणे गरजेचे आहे. किमान 30 फूट उंचीचा पूल होणे गरजेचे आहे.

तरडगाव जिल्हा परिषद गट संघर्ष समितीचे अतुल गायकवाड, माऊली मंचचे सतीश गायकवाड, प्रवीण गायकवाड आदींनी नागपूर येथे जाऊन प्रत्यक्ष मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.

अन्यथा तरडगाव, शिंदेमाळ, माळेवाडी, कुसूर, मिरेवाडी, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, पाडेगाव आदी गावांमधील शेतकर्‍यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!