

३१ मे हा भारतीय इतिहासातील एका विलक्षण स्त्रीच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा दिवस आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ओळख केवळ धार्मिक कार्य करणाऱ्या राणीपुरती मर्यादित न ठेवता, त्या कुशल प्रशासक, न्यायप्रिय राज्यकर्त्या, दूरदर्शी राजकारणी आणि प्रसंगी रणांगणात नेतृत्व करणाऱ्या धैर्यवान सेनानायिकाही होत्या. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा विशेष लेख.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ मे : अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. त्या काळात मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात नसताना त्यांनी आपल्या कन्येला शिक्षण दिले. याच शिक्षणाने आणि नैसर्गिक बुद्धिमत्तेने अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्वाचे गुण विकसित झाले. मालव्याचे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या गुणांची दखल घेत आपल्या पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचा विवाह लावून दिला.
आघातांवर मात करत स्वीकारली राज्याची धुरा
विवाहानंतर त्या होळकर घराण्यात आल्या, परंतु त्यांच्या आयुष्यातील पुढील काळ संघर्षांनी भरलेला होता. १७५४ मध्ये कुंभेरच्या युद्धात पती खंडेराव यांचे निधन झाले. त्यानंतर मल्हारराव होळकर आणि पुत्र मालेराव यांचेही निधन झाले. या सलग आघातांनी न खचता अहिल्यादेवींनी धैर्याने परिस्थितीचा सामना करत राज्यकारभाराची धुरा स्वीकारली. अठराव्या शतकातील पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत एका विधवा स्त्रीने राज्यकारभार हाती घेणे सोपे नव्हते. मात्र आपल्या बुद्धिमत्ता, प्रशासनकौशल्य आणि लोकविश्वास यांच्या बळावर त्यांनी सर्व विरोधकांना उत्तर दिले. १७६७ ते १७९५ या काळात त्यांनी मालवा राज्याचे नेतृत्व केले, जो होळकर राज्याच्या सुवर्णकाळांपैकी एक मानला जातो.
न्यायप्रियता आणि कुशल प्रशासन
अहिल्यादेवींच्या प्रशासनाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची न्यायप्रियता. त्या स्वतः जनतेच्या तक्रारी ऐकत आणि त्वरित निर्णय देत. प्रशासनातील भ्रष्टाचार, अन्याय आणि मनमानीला त्यांनी कधीही थारा दिला नाही. त्यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिली, व्यापारमार्ग सुरक्षित झाले आणि शेती-व्यापाराला चालना मिळाल्याने मालवा प्रदेश आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला.
दुर्लक्षित लष्करी पराक्रम आणि धैर्य
अहिल्यादेवींच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू अनेकदा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे त्यांचे लष्करी नेतृत्व. त्या घोडेस्वारी, शस्त्रविद्या आणि युद्धनीतीमध्ये पारंगत होत्या. त्यांनी सैन्याची पुनर्रचना करून राज्याच्या सीमा सुरक्षित केल्या. राघोबादादा पेशव्यांशी निर्माण झालेल्या संघर्षाच्या वेळी, ‘राज्याच्या सार्वभौमत्वावर आघात झाला तर आपण स्वतः सैन्याचे नेतृत्व करू’, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता. एका स्त्री राज्यकर्तीने तत्कालीन प्रभावशाली शक्तीसमोर दाखवलेले हे धैर्य इतिहासात विशेष उल्लेखनीय आहे. ब्रिटिश इतिहासकार सर जॉन माल्कम, मराठा इतिहासाचे अभ्यासक गो. स. सरदेसाई आणि इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी त्यांच्या या राजकीय व प्रशासनिक नेतृत्वाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.
लोकाभिमुख विकास आणि समतोल व्यक्तिमत्त्व
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात करुणा आणि कठोरता यांचा सुंदर समतोल होता. प्रजेच्या हितासाठी त्या ममत्वाने वागत; परंतु राज्याच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेत. त्यांनी रस्ते, विहिरी, तलाव, बाजारपेठा आणि सार्वजनिक सुविधा उभारल्या, ज्यामुळे व्यापार वाढला आणि लोकांचे जीवनमान उंचावले. त्यांनी अनेक धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी केली, जी त्या काळात केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचीही केंद्रे होती.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन हे संकटांवर मात करणाऱ्या नेतृत्वाची आणि स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा समतोल आणि वस्तुनिष्ठ विचार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. भारतीय इतिहासातील या महान स्त्रीला विनम्र अभिवादन!
– आयु. सोमीनाथ घोरपडे (संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व)
