प्रा.विलास वाघ यांच्या निधनाने कृतीशील विचारवंत काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली


स्थैर्य, मुंबई, दि.२५: सामाजिक कार्यकर्ते प्रा.विलास वाघ यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांतून परिवर्तनाची चळवळ पुढे नेणारे कृतीशील विचारवंत आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. प्रा.वाघ यांनी सुरु केलेली वंचित, उपेक्षित वर्गाच्या न्याय्य हक्काची लढाई पुढे नेणं त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

प्रा. विलास वाघ यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रा.विलास वाघ हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या मुलांसाठी शाळा, वसतीगृहे सुरु केली. मागास बांधवांना सोबत घेऊन सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्यशोधक परिवर्तनवादी विचारांचा प्रचार-प्रसार केला. या महामानवांच्या विचारांवर निष्ठा ठेवून राज्यातील प्रबोधनाची, परिवर्तनाची, सामाजिक सुधारणांची चळवळ पुढे नेण्याचे काम केले. सामाजिक प्रबोधनासाठी विपुल लेखन केले. शैक्षणिक, सामाजिक सुधारणांना बळ दिले. त्यांचे निधन ही राज्यातील पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांनी सुरु केलेले समाजप्रबोधनाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी प्रा. विलास वाघ यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!