
थेट WhatsApp वर मिळवा
विडणी येथील २२ केव्ही वीज उपकेंद्राच्या मंजुरीला दिलेली स्थगिती आणि ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याच्या हालचालींच्या विरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, १९ ऑक्टोबर रोजी महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १७ : विडणी ता. फलटण गावाला होणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी विडणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात आले होते. त्यानंतर विडणी येथे २२ केव्ही उपकेंद्र मंजुरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले होते. मात्र, वीज वितरण कंपनीने विविध कारणे दाखवून सदर उपकेंद्राच्या मंजुरीला स्थगिती दिली असून ते दुसरीकडे हलवण्याचा घाट घातल्याचे बोलले जात आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ विडणी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
महावितरण कार्यालयावर धडकणार मोर्चा
या महत्त्वपूर्ण प्रश्नावर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फलटण येथील मुख्य वीज वितरण कार्यालयावर धडकणार आहे. वीज वितरण कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पत्रामध्ये उपकेंद्रास दिलेली स्थगिती स्पष्ट करण्यात आली असून, याविरोधात ग्रामस्थ एकत्र आले आहेत.



