
स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: लडाख सीमेवर भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जनरल बिपिन रावत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कांग्रेसचे नेते राहुल गांधी हे उपस्थित होते. लष्कराचे सैनिक आणि सशस्त्र दलाचे अधिकारी यांचे भोजन वेगवेगळे का आहे?, असा प्रश्न या बैठकीत राहुल गांधी यांनी विचारल्याचे स्थायी समितीतील सूत्रांनी दिली.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातून आलेल्या जवानांची भोजनाच्या सवयी आणि स्वाद अधिका-यांच्या तुलनेत वेगळ्या असतात. बहुतेक अधिकारी हे शहरी भागातून आलेले असतात. असे असले तरी जवान आणि अधिका-यांना वाढण्यात येणा-या भोजनाच्या गुणवत्तेत कोणताही फरक नाही, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बैठकीतील विषय संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींकडून माहिती घेणे, विशेषत: सीमावर्ती क्षेत्रात संरक्षण दलांसाठी रेशन आणि आवश्यक वस्तूंच्या गुणवत्ता राखणे असे होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सद्य स्थितीवर एका प्रेझेंटेशनची मागणी केली अशी माहिती सूत्रांनी दिली. शरद पवार यांच्या मागणीची दखल घेतली गेली असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी म्हटले आहे.
या पूर्वी राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. चीनने आमच्या जमीनीवर कब्जा केला आहे. भारत सरकार ही जमीन परत मिळवण्याची योजना बनवत आहे का? किंवा मग ही एक दैवी घटना असल्याचे सांगून हे प्रकरण सोडून देऊ इच्छिते, असे प्रश्न राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी या पूर्वी अनेकदा चीनी घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.