आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोमवारपासून आंदोलन आमदार, खासदारांच्या घरांसमोर वाजवणार ढोल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.१२: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज हवालदिल झाला असून मराठा क्रांती मोर्चा सोमवारपासून सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या घरासमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करणार आहे, अशी माहिती संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी औरंगाबादेत पार पडली. या बैठकीला विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची चिकित्सा करण्यात आली. यानंतर पुढील कायदेशीर मार्ग आणि आंदोलन याविषयी निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ठोक मोर्चाचे रमेश केरे-पाटील म्हणाले की, राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागे उभे राहावे. शासनाची भूमिका समजू द्या, तोपर्यंत समाजबांधवांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. किशोर चव्हाण म्हणाले की, पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेत यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.

मराठा समाजातील मुलांनी आत्महत्या करायची नाही. राज्य, केंद्र आणि न्यायालय, असे तीन पर्यायी मार्ग क्रांती मोर्चासमोर आहेत. आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाली म्हणजे सर्व मार्ग बंद झाले, असा त्याचा अर्थ होत नाही. प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करताना केवळ मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा झटपट निर्णय झाला. मराठा समाज सोमवारपासून आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार असल्याचे यावेळी प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, यवतमाळ येथे आंदोलन करण्यात आले.

कोरोना काळातील आॅनलाइन सुनावणीचा फटका आरक्षणाला बसला आहे. घटनापीठाकडे वर्ग करताना याला स्थगिती देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी सरकार व विरोधी पक्षांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे आवाहन मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणा-या वकिलांनी केले.

आरक्षणासाठी वटहुकुमाचा पर्याय


मराठा आरक्षण लागू करण्यात आलेला न्यायालयीन स्थगितीचा अडथळा दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी अध्यादेशाचा पर्याय सुचवला आहे. अध्यादेशाच्या पयायार्चा विचार राज्य सरकारने करावा. मी अद्याप त्यातील कायदेशीर बाबी तपासल्या नाहीत, परंतु अध्यादेश हा एक पर्याय सध्या असू शकतो, असे पवार म्हणाले.

त्यांनी म्हटले की, ‘आर्थिकदृष्ट्या मागास वगार्ला ५० टक्क्यांवर अधिकचे १० टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत कायद्यात सुधारणा करण्यात आली. हा निर्णयही न्यायालयाधीन असल्याने तो काही वेगळा लागेल, असे वाटत नाही. पण तरीही हे आरक्षण कसे टिकेल व मुलांना न्याय कसा मिळेल, यावर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील. मराठा आरक्षणात केंद्र आणि राज्य सरकार असा वाद आणण्याची गरज नाही, असे माझे मत आहे.’

जालन्यात बसची तोडफोड

मराठा आरक्षणाला अंतरीम स्थगिती मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या आहेत. जालन्यातील घनसावंगी शहराजवळ ही घटना घडलीय. बसमधील प्रवाशांना बसच्या खाली उतरवून देत ही तोडफोड करण्यात आली.

अंबड आगाराच्या बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहेत. ही दगडफेक नेमकी कोणत्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणाची मागणी करत बसच्या समोरील आणि मागील बाजूच्या काचा फोडल्या आहेत. यामध्ये बसचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टायर जाळले

सोलापूर-पुणे महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले. मराठा आरक्षण जोवर मिळत नाही तोवर मराठा समाजातील युवक शांत बसणार नसून गनिमी कावा पध्दतीने हे आंदोलन करतच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी दिली. टायर जाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून ठेवला होता. अर्धा तास वाहतूक खोळंबली होती मात्र कोणतीही पोलीस यंत्रणा तेथे पोहोचली नव्हती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!