कोळकीचा गावगाडा कोण हाकणार ?


 

स्थैर्य, कोळकी दि.१४ : सध्या जिल्ह्यासह तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. नुकताच निवडणुक आयोगाकडून राज्यातील कोरोनामुळे प्रलंबित असलेल्या सर्व ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला. त्यानुसार येत्या काही दिवसांत कोळकी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. एवढे दिवस गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार असलेले हौसे, नवसे व गौसे आता गावभर प्रचार सुरु करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे या निवडणूकीतून कोळकी ग्रामस्थ गावगाडा हाकण्यासाठी कुणाच्या हाती सत्ता देणार? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोळकी ग्रामपंचायतीवर यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच राजे गटाची एक हाती सत्ता राहिलेली आहे. लोकसभा निवडणूकीत फलटणचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी झाल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी विरोधात भाजपची ताकदही वाढत आहे. त्यामुळे आता कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही दमदारपणे उतरणार असल्याने कोळकी ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची बनणार असल्याचेही बोलले जात आहे.

कोळकी ग्रामपंचायतीची एकूण 17 सदस्य संख्या आहे. ग्रामपंचायतीमध्ये एकूण 6 वॉर्ड असून 5 वॉर्डमधून प्रत्येकी 3 ग्रामपंचायत सदस्य तर राहिलेल्या एका वार्डमधुन 2 असे सर्व मिळून एकूण 17 सदस्य ग्रामपंचायतीवर निवडून जात असतात. भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकनियुक्त सरपंच पदाची घोषणा केलेली होती. परंतु कोळकी ग्रामपंचायतीला काही लोकनियुक्त सरपंच मिळालेला नाही. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी लोकनियुक्त सरपंच पदाची घोषणा केल्यानंतर व त्याची अंमलबजावणी होण्याच्या आधीच कोळकी ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली होती व त्यानंतर आत्ता महाविकास आघाडी सरकारने लोकनियुक्त सरपंच पद्धत रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच निवड ठेवल्यामुळे कोळकीमध्ये लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार नाही. शिवाय, सरपंच पदाची आरक्षण सोडत यंदा मतदानानंतर होणार असल्यामुळे निवडून जाणार्‍या 17 सदस्यांपैकी सरपंचपदी कुणाची वर्णी लागणार? याबाबत कुणालाच खात्रीशीर सांगता येणार नाही. त्यामुळे सरपंचपदाबाबतही अखेरपर्यंत उत्सुकता राहणार आहे. 

कोळकी ग्रामपंचायतीच्या मागील निवडणुकीमध्ये कोळकी ग्रामपंचायतीचे जेष्ठ सरपंच व विद्यमान सदस्य दत्तोपंत शिंदे हे अगदी थोड्या मताने निवडून आलेले होते. त्यांना युवा नेते रमेश नाळे यांनी चांगलेच आवाहन देऊन दत्तोपंत शिंदे यांना निवडणूकीमध्ये जेरिस आणलेले होते. आताच्या होणार्‍या निवडणुकीमध्ये कोळकी ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य दत्तोपंत शिंदे यांची भूमिका काय राहणार? याकडे देखील आता कोळकी ग्रामस्थांचे लक्ष लागुन राहिलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!