

कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथील पळसवाट शिवारात वाठार पोलिसांनी कारवाई करत सात जणांना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थैर्य, वाठार, दि. २८ मे : कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावाच्या हद्दीतील पळसवाट शिवारात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर वाठार पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत सात जणांना जागीच पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार, २७ मे रोजी वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना बिचुकले येथील पळसवाट शिवारात काही लोक पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
या माहितीवरून उपनिरीक्षक सातव आणि डी.बी. पथकातील हवालदार उदय जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचांना सोबत घेऊन जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. यावेळी सात जण पैशांवर तीन पानी जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, डावातील व अंगझडतीतील रोख रक्कम आणि मोटारसायकली असा एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाठार पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘या’ संशयितांवर कारवाई
या कारवाईत अर्जुन नारायण पवार (वय ५०), मानसिंग साहेबराव पवार (वय ६१), विनोद हणमंत पवार (वय ४५), शिवाजी नथू शिंदे (वय ७०), अरुण धर्माजी सपकाळ (वय ६५), बाळकृष्ण चंदरराव पवार (वय ४७, सर्व रा. बिचुकले, ता. कोरेगाव) आणि अण्णा शंकर पवार (वय ४६, रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तपास व पथक
सपोनि सुशील भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, अंमलदार विठ्ठल काळे, प्रतीक देशमुख, तेजस कर्णे, विजय ढाणे तसेच महिला पोलीस दीपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख आणि पूजा जगताप यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस अंमलदार विठ्ठल काळे यांनी दिली असून, पुढील तपास हवालदार जितेंद्र शिंदे करत आहेत.