फलटण-लोणंद महामार्गावर ट्रॅक्टरच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकावर उपचार सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे हद्दीत उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात भोर तालुक्यातील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑक्टोबर : फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात भोर तालुक्यातील २० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेत त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकी आणि ट्रॅक्टरची धडक

सुवर्णदीप सुरेश जगताप (वय २०) आणि त्याचा मित्र रोहित रवींद्र घोगरे (दोघे रा. रांझे, ता. भोर, जि. पुणे) हे दोघे दुचाकीवरून (MH १२ DN ०८२२) विडणी येथून आपल्या गावाकडे जात होते. रविवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेला ट्रॅक्टर (MH १६ CQ ९७३६) आणि त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सुवर्णदीप याच्या पायावरून ट्रॅक्टर गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पळून गेला.

पोलिसांची धाव आणि उपचार

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महादेव पिसे आणि अमोल पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी सुवर्णदीप याला उपचारासाठी बारामती येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. जखमी रोहित घोगरे याच्यावर खेड-शिवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी मयत सुवर्णदीप याचा मावसभाऊ ऋषिकेश अनंता जगताप (रा. विडणी) याने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जगताप कुटुंबावर अवघ्या अडीच महिन्यांपूर्वीच सुवर्णदीपच्या वडिलांच्या निधनाचे मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर आता तरुण सुवर्णदीप याचाही अपघातात मृत्यू झाल्याने आई आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महामार्गावरील उसाच्या ट्रॅक्टरची भरधाव वाहतूक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!