
थेट WhatsApp वर मिळवा
जागतिक नैसर्गिक वारसा लाभलेल्या सातारा येथील कास पठारावर युरोपियन नीलकंठ हा आकर्षक स्थलांतरित पक्षी आढळला असून, या दुर्मीळ नोंदीमुळे परिसरातील पक्षीवैविध्यामध्ये भर पडली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २६ ऑक्टोबर : जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ असलेल्या सातारा जवळील कास पठारावर पर्यावरण अभ्यासक गणेश सातव यांनी केलेल्या निरीक्षणात युरोपियन नीलकंठ (युरोपियन रोलर) हा सुंदर स्थलांतरित पक्षी आढळून आला आहे. या दुर्मीळ पक्ष्याच्या आगमनामुळे कासच्या समृद्ध जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
युरोपियन नीलकंठाची वैशिष्ट्ये
युरोप आणि मध्य आशियात प्रजनन करणारा हा पक्षी हिवाळ्याच्या काळात आफ्रिकेकडे स्थलांतर करतो. प्रवासादरम्यान या पक्ष्याचे भारतात दुर्मिळ दर्शन होते. निळसर-फिरोजी रंगाचे शरीर आणि तांबूस-तपकिरी पाठ हे या पक्ष्याचे प्रमुख आकर्षण आहे. भारतात आढळणाऱ्या स्थानिक इंडियन रोलरपेक्षा हा पक्षी वेगळा असून, त्याच्या या नोंदीमुळे पक्षी अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.





