वाठार: घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित जेरबंद – मुसक्या आवळल्या


कोरेगाव तालुक्यातील सोनके येथील घरफोडी प्रकरणातील फरार संशयिताला वाठार पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

स्थैर्य, वाठार, दि. २४ मे : कोरेगाव तालुक्यातील सोनके येथे झालेल्या घरफोडी प्रकरणातील एका फरार संशयिताला वाठार पोलिसांनी जेरबंद केले आहे. लखन रमेश भोसले (रा. भुरकरवाडी, ता. फलटण) असे या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

आठ फेब्रुवारी रोजी वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनके (ता. कोरेगाव) येथे घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी वाठार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी डीबी पथकाला मार्गदर्शन करून शोधमोहीम राबवली.

पाच वर्षांपासून होता फरार

हा संशयित आरोपी गेल्या पाच वर्षांपासून एका गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात घेत चौकशी केली असता, त्याने सोनके येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले यांच्यासह उदय जाधव, जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, किशोर गिरी आणि इतर अंमलदारांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार उदय जाधव हे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!