
फलटण तालुक्यातील वडजलजवळ वारकरी दिंडीवर अज्ञातांनी हल्ला करत ७० हजारांची लूट केली. दिंडी चालकाला मारहाण झाली असून या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ११ जुलै : आषाढी वारीनंतर पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकरी दिंडीवर फलटण तालुक्यातील वडजलजवळ अज्ञातांनी हल्ला करत ७० हजार रुपयांची लूट केली आहे. या घटनेत दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना बेदम मारहाण झाली असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
पैशांची लूट आणि दगडफेक
५ जुलैच्या मध्यरात्री पुणे-पंढरपूर महामार्गावरील वडजलजवळील काशीदवाडी फाट्याजवळ दिंडी विश्रांती आणि जेवणासाठी थांबली होती. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक करत दिंडीवर हल्ला केला. दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्याकडील सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लुटून पळ काढला. मारहाणीत गंभीर जखमी होऊनही कोळेकर यांनी आपला वारीचा प्रवास सुरूच ठेवला.
पोलिसांच्या भूमिकेवर वारकऱ्यांचे आरोप
वारकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आले होते. मात्र, या प्रकरणी गुन्हा दाखल न करता “इथून निघून जा, गाडीची हवा सोडली असती तर काय झाले असते,” अशा स्वरूपाचे वक्तव्य करून पोलिसांनी दडपण आणल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. या गंभीर घटनेची दखल घेऊन पोलिसांनी स्वतःहून (सुमोटो) गुन्हा दाखल करावा आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वारकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.
वारकऱ्यांची व्यथा आणि मागणी
आपल्यावरील हल्ल्याबाबत त्रिंबक कोळेकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले, “आम्ही विठुरायाच्या नामस्मरणात वारी करत होतो. आमचे कोणाशीही वैर नव्हते. पण आमच्यावर अचानक हल्ला झाला. माझ्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि पैसेही नेले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने पुढे यावे आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी.”
पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया
या घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सविस्तर माहिती दिली. डायल ११२ वरून आलेल्या कॉलनुसार ग्रामीण आणि शहर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. परंतु, संबंधित वारकऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत कोणतीही तक्रार दिली नाही आणि ते तेथून पुढे निघून गेले. या प्रकरणी रीतसर तक्रार आल्यास त्वरित गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.