
थेट WhatsApp वर मिळवा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती आणि विक्री दरांमधील तफावतीमुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला प्रति एलपीजी सिलिंडरमागे तब्बल २४५ रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, नोव्हेंबर महिन्यात हा तोटा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. २५ ऑक्टोबर : जागतिक बाजारातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण आला आहे. HPCL ला प्रति सिलिंडर २४५ रुपयांचा तोटा होत असून, आगामी काळात हा तोटा ३२७ रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वाढत्या तोट्याचे कारण आणि आर्थिक भार
पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, मालवाहतूक खर्चही वाढला आहे. सुएझमॅक्स टँकरचे मालवाहतूक दर प्रति बॅरल ९ डॉलरवर पोहोचले आहेत. यामुळे तेल विपणन कंपन्यांच्या ताळेबंदावर विपरीत परिणाम झाला असून, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत एलपीजी सिलिंडरच्या विक्रीतून कंपनीला ५०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार का?
सध्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून घरगुती सिलिंडर कमी दरात विकले जात आहेत. कंपन्यांना होणाऱ्या या प्रचंड तोट्यामुळे आगामी काळात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्याची परिस्थिती निर्माण होते का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.





