विडणी: ‘अनित्य, अनात्म व दुःख समजल्याशिवाय जीवन समजत नाही’ – पूज्य भंते करुणानंद महाथेरो


फलटण तालुक्यातील समता नगर, विडणी येथे कालकथित सुमनताई मोहिते यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जाहीर धम्मदेसना कार्यक्रमात पूज्य भंते करुणानंद थेरो यांनी बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले.

स्थैर्य, विडणी, दि. २८ मे : कालकथित सुमनताई सचिन मोहिते यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त समता नगर, विडणी (ता. फलटण) येथे जाहीर धम्मदेसना कार्यक्रम अत्यंत श्रद्धामय वातावरणात पार पडला. या प्रसंगी पूज्य भंते करुणानंद थेरो यांनी उपस्थितांना बुद्ध धम्म, मानवी जीवन, दुःख आणि अनित्यता या विषयांवर मार्गदर्शन करून भारावून टाकले.

त्रिसूत्री सिद्धांत आणि मानवी जीवन

तथागत बुद्धांनी मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला असल्याचे सांगून भंतेजींनी ‘अनित्य, अनात्म आणि दुःख’ या त्रिसूत्री सिद्धांताचे सोप्या भाषेत विवेचन केले. जीवन क्षणभंगुर असून प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येते, मात्र अष्टांगिक मार्ग हा त्यावर उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पटाचारा, किसा गौतमी, विशाखा यांसारख्या महामातांचा दाखला देत त्यांनी मृत्यू आणि परिवर्तनशीलतेचे वास्तव उलगडले. “जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे. त्यामुळे अहंकार, लोभ बाजूला ठेवून शील आणि माणुसकीचा मार्ग स्वीकारावा,” असा संदेश त्यांनी दिला.

धम्मप्रचाराची गरज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा संदर्भ देत भंतेजी म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि आचरण करणे ही प्रत्येक बौद्धाची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्रात धम्मकार्य व्यापक करण्यासाठी कराड परिसरात प्रशिक्षण व साधना केंद्र उभारण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बोधिवृक्ष पूजन व सन्मान

सुमनताई मोहिते यांच्या स्मरणार्थ लावलेल्या बोधिवृक्षाच्या पहिल्या स्मृतिदिनी भंते करुणानंद यांच्या हस्ते विशेष श्रद्धापूर्वक ‘बोधिवृक्ष पूजन व धम्मस्मरण विधी’ करण्यात आला. यावेळी सर्वांनी वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी मेत्ताभावना केली. तसेच भंतेजींनी समतानगर येथील बुद्ध विहारास भेट दिली. भारतीय बौद्ध महासभा आणि समतानगर बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने भंतेजींना ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ, चिवर व धम्मदान देऊन सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास समता सैनिक दलाचे राज्य संघटक दादासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभेचे नानासो मोहिते, सुजाता गायकवाड, सोमीनाथ घोरपडे, भीमराव लोंढे, अनुराधा सोनवणे, चंद्रकांत मोहिते, महावीर भालेराव यांच्यासह विविध पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीच्या चित्राताई गायकवाड, मोहिते कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी मोहिते परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले व सर्वांना भोजनदान देण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!