
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२६ | अमरावती |
जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागली. डॉक्टर, परिचारिका आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी तत्परता दाखल्यामुळे इतर अनेक बालकांचे प्राण वाचल्याची माहिती आहे. एवढी आग लागली असूनही आम्ही स्वतःचा विचार न करता बाळांना वाचवलं, असं दोघा परिचारिकांनी सांगितलं. दोघींची भाजून काळवंडलेले हात त्यांच्या धाडसाची साक्ष देत होते.
व्हेंटिलेटरमध्ये स्फोट
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत भाजल्यामुळे तीन नवजात अर्भकांचा मृत्यू झाला.
तिसर्या मजल्यावर एकूण तीन कक्ष असून घटनेच्या वेळी या वॉर्डमध्ये ३९ बालकं असल्याची माहिती आहे. रुग्णालयातील परिचारिका, डॉक्टर आणि इतर कर्मचार्यांनी अन्य नवजात बालकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. त्यापैकी सहा बालकांवर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.
