
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील दुष्काळग्रस्त ९२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ नोव्हेंबरपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत थेट जमा होणार असून, या मदतीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही ई-केवायसी करण्याची आवश्यकता उरलेली नाही.
स्थैर्य, , सातारा, दि. २६ ऑक्टोबर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत थेट जमा केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी वेळखाऊ ‘ई-केवायसी’ करण्याची कोणतीही अट असणार नाही. ‘ॲग्रीस्टॅक’ क्रमांकाच्या माध्यमातून ही रक्कम ४ नोव्हेंबरपूर्वी थेट जमा केली जाईल, असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला आहे.
अॅग्रीस्टॅकमुळे ई-केवायसीची गरज नाही
शेतकऱ्यांना मदत मिळताना कोणताही विलंब होऊ नये, यासाठी नुकसानभरपाईचे पंचनामे करतानाच शेतकऱ्यांचा ‘ॲग्रीस्टॅक’ क्रमांक आणि बँक खात्याची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रियेतील प्रशासकीय अडथळे दूर झाले असून, थेट बँक खात्यात पैसे पाठवणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता आणि याबाबतचा अधिकृत शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
एनडीआरएफ निधीतून पुढील भरपाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिली जाणारी ही मदत ५ हजार रुपयांची असणार आहे. याशिवाय, केंद्राच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीकडून (NDRF) अतिरिक्त निधी प्राप्त झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईचे वितरण केले जाणार आहे. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने विविध विभागांच्या निधीला २० टक्क्यांची कात्री लावून ती रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवली आहे.





