दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२४ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यातील जनतेला वाहन पासिंगसाठी व आरटीओ कार्यालयाच्या कामानिमित्त सातारा येथे जावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना खर्च व त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत होता. याची दखल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील जनतेच्या सोईसाठी नवीन आरटीओ कार्यालय नुकतेच मंजूर करून आणले.
आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालया (आटीओ) साठी जागा उपलब्ध करून सातारा आरटीओ कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदीप म्हेत्रे, मोटार वाहन निरीक्षक योगेश ओतारी, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल थोरात या अधिकार्यांसमवेत जागेची पाहणी केली व लवकरच नवीन कार्यालय बांधण्यासाठी साधारण तीन एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही खासदार रणजितसिंह यांनी अधिकार्यांशी बोलताना सांगितले. हे आरटीओ कार्यालय जुने लेडीज होस्टेल इमारत, शिंगणापूर रोड, शिवाजीनगर, फलटण येथे सुरू करण्यात आले आहे.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.