कोळकीमधील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल येथे रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद


दैनिक स्थैर्य | दि. १२ मार्च २०२४ | फलटण |
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी, फलटण व लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार, दि. १० मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.

यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सरस्वती, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती निर्माण व्हावी व दातृत्वाची भावना वाढीस लागावी आणि समाजशील उपक्रम शाळेमधून व्हावा, शाळा-विद्यार्थी-पालक समन्वयात वाढ व्हावी यासाठी असे उपक्रम शालेय पातळीवर घेतले जातात, असे सांगितले.

त्यानंतर ला. नीलम देशमुख यांनीदेखील महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिला सक्षमीकरणावर आधारीत बरीच माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनीही रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच काकांनी महिलांनी आनंदी जीवन कसे जगावे व समाजातील इतर परिस्थितीतून मार्ग काढताना, संकटाला तोंड देताना काय केले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.

लायन्स क्लब फलटण गोल्डन यांच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांचा, हॉस्पिटल मधील सेविका, शाळांमधील सेविका व एक मुलगी असणार्‍या मातांचा सन्मान करण्यात आला. श्री. देशमुख काकांच्या हस्ते फित कापून रक्तदान शिबिरास सुरूवात झाली. शिबिरात एकूण २८ दात्यांनी रक्तदान केले.

यावेळी उपस्थित राजनकाका देशमुख महाराज, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य अमित सस्ते, रक्षक रयतेचा संपादक नासीर शिकलगार, राजू बनसोडे, उद्धव बोराटे, लायन सौ. उज्ज्वला निबांळकर, ऋषिकेश बिचुकले, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, सौ. सुवर्णा निकम, योगिता सस्ते उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी राजनकाका देशमुख महाराज यांच्या श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ फलटण व रक्षक रयतेचा परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!