स्थैर्य, सातारा, दि.७: माजी नंबर वन अमेरिकेची सेरेना विल्यम्स यूएस ओपनच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली. सेरेनाने स्पर्धेत १९ व्या वेळी ही कामगिरी केली. तिने अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २-६, ६-२, ६-२ ने मात दिली. सेरेनाने एक तास ४३ मिनिटांत सामना आपल्या नावे केला. सेरेनाने विजयानंतर म्हटले की, पहिला सेट गमावल्यानंतर मी अधिक शांत राहण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी केवळ प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, हे माहिती हाेते.
स्टीफन्सने येथे २०१७ मध्ये किताब जिंकला होता. क्वार्टर फायनलमध्ये तिसऱ्या मानांकित सेरेनाचा सामना १५ व्या मानांकित यूनानच्या मारिया सक्कारीशी होईल. सक्कारीने अमेरिकेच्या अमांडा एनिसिमोवाला ६-३, ६-१ ने हरवले. सक्कारीने गेल्या आठवड्यात वेस्टर्न अॅड सदर्न ओपनमध्ये सेरेनाला हरवले होते. बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंकादेखील प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली. त्याचबरोबर सोफिया केनिन व एलिसी मर्टेंसने देखील आपापले सामने जिंकले.
पुरुष एकेरीत दुसऱ्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमने माजी चॅम्पियन क्रोएशियाच्या मारिन सिलिचला पराभूत करत प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. थिएमने २०१४ मध्ये अमेरिकन ओपनचा किताब जिंकणाऱ्या सिलिचला ६-२, ६-२, ३-६, ६-३ ने हरवले. आता त्याचा सामना कॅनडाचा युवा खेळाडू फेलिक्स एगुर एलियासिमेशी होईल. तिसरा मानांकित डॅनियल मेदवेदेव देखील जिंकला.
बोपन्ना व शापोवालोवचा शानदार विजय
भारताचा रोहन बोपन्ना व त्याचा कॅनडाचा सहकारी डेनिस शापोवालोव जोडीने पुरुष दुहेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्यांनी जर्मनीच्या केविन क्रावित्ज व अँड्रीस मीसला ४-६, ६-४, ६-३ ने मात दिली. आता त्यांचा सामना हॉलंडच्या जीन जूलियन रॉजर व रोमानियाचा होरियाशी होईल.