यूजीसी नेट डिसेंबर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; मराठी विषयाची परीक्षा ‘या’ दिवशी होणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट डिसेंबर परीक्षेचे विषयानुसार वेळापत्रक जाहीर केले असून १४ ते २१ डिसेंबरदरम्यान दोन सत्रांत परीक्षा पार पडणार आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २२ नोव्हेंबर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) यूजीसी नेट डिसेंबर परीक्षेचे विषयानुसार सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार १४, १५, १६, १७ आणि २१ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असून, मराठी विषयाचा पेपर १६ डिसेंबरला दुपारच्या सत्रात होणार आहे.

महत्त्वाच्या विषयांच्या तारखा आणि सत्र

परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १४ डिसेंबरला सकाळच्या सत्रात इतिहास, शिक्षण, समाजकार्य आणि लोक प्रशासन, तर दुपारच्या सत्रात कॉम्प्युटर सायन्स, मानसशास्त्र आणि मॅनेजमेंट विषयांची परीक्षा होईल. १५ डिसेंबरला सकाळी राज्यशास्त्र आणि इंग्रजी, तर दुपारी वाणिज्य आणि शारीरिक शिक्षण विषयांचे पेपर होतील. १६ डिसेंबरला दुपारच्या सत्रात मराठीसह भूगोल विषयाची परीक्षा पार पडणार असून १७ डिसेंबरला सकाळी अर्थशास्त्र, हिंदी आणि दुपारी कायदा, पत्रकारिता व समाजशास्त्र या विषयांची परीक्षा घेतली जाईल. २१ डिसेंबरला संस्कृत, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांख्यिकी विषयांच्या परीक्षेने या सत्राची सांगता होईल.

परीक्षा केंद्र आणि प्रवेशपत्राबाबत महत्त्वाची सूचना

उमेदवारांचे परीक्षा केंद्र नेमके कोणत्या शहरात असेल, याची माहिती परीक्षेच्या साधारण २१ दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळाला नियमित भेट देत राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परीक्षा प्रक्रियेसंदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास उमेदवारांनी ०११-४०७५९००० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ईमेलवर पत्रव्यवहार करावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!