अनाथ मुलांना हक्काचे घर आणि सरकारी नोकरी; महिला व बालविकास विभागाच्या कामगिरीत महाराष्ट्र देशात अव्वल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्याच्या महिला व बालविकास विभागाने २,३७६ दत्तक विधाने पूर्ण करून देशात प्रथम क्रमांक पटकावला असून १,०६० अनाथ तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. २२ नोव्हेंबर : राज्यातील अनाथ आणि वंचित मुलांना हक्काचे कुटुंब मिळावे आणि त्यांचे भविष्य स्वावलंबी घडावे, यासाठी महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यात तब्बल २ हजार ३७६ दत्तक विधाने यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून गेल्या पाच वर्षांत दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्राने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

‘प्रथम कुटुंब’ धोरण आणि ‘फॉस्टर केअर’ उपक्रमाला यश

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्येक मुलाला कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित करत ‘प्रथम कुटुंब’ धोरणावर विशेष भर दिला आहे. राज्यात सध्या ६२ विशेष दत्तक संस्था कार्यरत असून बालसंगोपन संस्थांशी उत्तम समन्वय साधल्याने २०० हून अधिक मुले कायदेशीररीत्या दत्तक जाण्यासाठी पात्र ठरली आहेत. तसेच प्रायोगिक तत्त्वावरील ‘फॉस्टर केअर’ उपक्रमांतर्गत १५ मुलांना पालक कुटुंबांमध्ये पाठवण्यात आले असून १२९ मुले या प्रक्रियेसाठी पात्र ठरली आहेत.

१,०६० अनाथांना सरकारी नोकरी आणि दरमहा आर्थिक आधार

सप्टेंबर २०२६ पर्यंत राज्यात १२ हजारांहून अधिक अनाथ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून एक टक्का आरक्षण धोरणांतर्गत १ हजार ६० प्रमाणपत्रधारकांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. याशिवाय २०२६-२७ या वर्षात उच्च व तंत्रशिक्षणाच्या शुल्कासाठी ९९ अनाथ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’अंतर्गत १ लाख ७२ हजार ६५६ मुलांना दरमहा २,२५० रुपये, तर ‘मिशन वात्सल्य’ योजनेअंतर्गत ३२ हजार ५२० मुलांना दरमहा ४,००० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात असून सज्ञान होण्यापूर्वीच मुलांच्या शिक्षण व कौशल्याचे नियोजन विभागाकडून केले जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!