सातारा पालिकेच्या राजकारणात उदयनराजेंची बेरजेची खेळी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१४ : पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडी नुकत्याच झालेल्या विशेष सभेत बिनविरोध पार पडल्या. नव्या निवडीदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या खुर्च्या महिलांकडे सोपवल्या. पाच महिला पदाधिकाऱ्यांच्या मदतीने नगराध्यक्षा माधवी कदम यांना उदयनराजेंचा विकासात्मक अजेंडा पुढे न्यावा लागणार आहे. दरम्यान भाजपाचे नगरसेवक मिलींद काकडे यांच्यानंतर नगरसेविका सिद्धी पवार यांनी बांधकाम सभापतीपदी वर्णी लावून पालिकेच्या राजकाराणात बेरीज करण्याचा प्रयत्न केला आहे.

पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदाचा कार्यकाल ता. 3 जानेवारी संपल्याने नवीन निवडीचा कार्यक्रम प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी जाहीर केला होता. यानुसार नुकत्याच पालिकेच्या सभागृहात सभापती निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी प्रांताधिकारी मुल्ला, मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्षा माधवी कदम उपस्थित होत्या.

वेळापत्रकानुसार रिक्‍त जागांची माहिती ऑनलाइन सर्व नगरसेवकांना देण्यात आली. सभापतिपदाचे अर्ज दाखल झाल्यानंतर उपसभापतिपदासाठीचे अर्ज दाखल करून घेण्यात आले. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडत असतानाच शिक्षण मंडळाच्या पदसिद्ध सभापतीची घोषणा करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक वेळापत्रकानुसार आरोग्य सभापतीसाठी अनिता घोरपडे, महिला व बालकल्याणसाठी रजनी जेधे, पाणीपुरवठा सभापतीसाठी सीता हादगे, नियोजन सभापतीसाठी स्नेहा नलावडे, बांधकाम सभापतीसाठी सिद्धी पवार, स्थायी समितीच्या सदस्यपदासाठी निशांत पाटील यांनी आपले अर्ज दाखल केले. छाननीनंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला. हा कालावधी संपल्यानंतर प्रत्येक पदासाठी एक- एक अर्ज दाखल झाल्याचे सांगत निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा प्रांताधिकारी मुल्ला यांनी जाहीर केले.

यानंतर अनिता घोरपडे, रजनी जेधे, सीता हादगे, स्नेहा नलावडे, सिद्धी पवार, तसेच निशांत पाटील हे सभागृहात दाखल झाले. त्यांचा प्रांताधिकारी मुल्ला, मुख्याधिकारी बापट, नगराध्यक्षा कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांनी सत्कार केला.


Back to top button
Don`t copy text!