कोळकी समशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आणखी दोन शेड्स उभारणार व स्मशानभूमीला पत्र्याचे कंपाउंड करणार : श्रीमंत शिवरूपराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ३० : कोळकी, ता.फलटण येथील कोरोनाबाधितांच्या स्मशानभूमीमध्ये बसून एक मनोरुग्ण मृतदेहाचा काही भाग खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे फलटण शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर प्रशासनाच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, ‘‘या ठिकाणच्या मृतदेहांचे संपूर्ण दहन झाले आहे. अन्यविधीसाठी ठेवण्यात आलेले पदार्थ सदर मनोरुग्ण खात असावा’’, असा संशय नगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ह्या घडलेल्या प्रकारानंतर कोळकी येथील स्मशानभूमीला पत्र्याचे कंपाउंड करण्यात येणार आहे, त्या सोबतच फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून कोळकी येथे अंत्यविधीसाठी अजून दोन शेड्स उभे करण्यात येणार आहेत. म्हणजेच एकूण ६ अंत्यसंस्कार एका वेळेस कोळकी येथील स्मशानभूमीमध्ये होऊ शकतात.

या बाबत पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक संपन्न झाली. त्या वेळी कोळकी येथील स्मशानभूमीमध्ये अजून दोन शेड्स उभारण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आलेला आहे. कोळकी येथील स्मशानभूमीला पत्र्याचे कंपाउंड हे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया व क्रेडाई यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या वेळी फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, तहसीलदर समीर यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकार डॉ. अमिता गावडे – पवार यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर कोळकी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत असतात. ज्या वेळी अंत्यसंकर करण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी कोळकी येथील स्मशानभूमीमध्ये जात असतात. आता ह्या पुढे तेथील मृतदेह संपूर्ण दहन होईपर्यंत तेथे कर्मचारी तैनाद राहणार आहेत, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.

कोळकी येथील स्मशानभूमीत कोरोनाने मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. बुधवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास या स्मशानभूमीत एक मनोरुग्ण चितेजवळ बसून काहीतरी खात असल्याचे दिसत होते. परंतू सदर व्हिडिओ काढणाराने हा मनोरुग्ण तेथे जळत असलेल्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचा दावा केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडालेली होती. सदर प्रकरणातील मनोरुग्णास नगर परिषद प्रशाशन व फलटण पोलिसांनी वेळे ता. वाई येथील यशोधन ट्रस्टच्या यशोधन निवारा केंद्रामध्ये दाखल केले आहे. प्राथमिक माहितीमध्ये या रुग्णाने तो हैद्राबाद येथील असल्याचे समोर येत आहे. त्याची तेथे कोरोना बाबतची रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्या पैकी त्याची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. तर आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल दोन दिवसांनंतर येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर खाजगी अथवा सरकारी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. तो बरा झाल्यानंतर त्याचे घर शोधण्यात येणार आहे, अशी माहिती यशोधन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवी बोडके यांनी दिलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!