सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीतील दोघेजण जाळ्यात; १२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत


स्थैर्य,पिंपरी,दि २३: चोरीच्या दुचाकींचा वापर करून सोनसाखळी हिसकावून चोरून नेणाऱ्या इराणी टोळीतील दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

सफिर फिरोज खान (वय ३५, रा. लोणावळा), मोहम्मद उर्फ डॉन शहाबुद्दीन इराणी (वय २५, रा. शिवाजी नगर, पुणे), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरी करणारे आरोपी खान व इराणी हे देहू फाट्याकडून मोशीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डुडुळगाव येथे सापळा रचून खान आणि इराणी यांना ताब्यात घेतले. वाकड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना ५ फेब्रुवारी रोजी अटक केली.

आरोपींनी त्यांचा साथीदार आरोपी मोहसीन लालू जाफरी (रा. रायसेन, मध्यप्रदेश) याच्यासोबत सोनसाखळी चोरी केल्या. त्यांच्याकडून सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील ११ लाख रुपये किंमतीचे २२० ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच एक लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी, असा एकूण १२ लाख ६५ हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्यामध्ये वाकड, सांगवी, देहूरोड या पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी तीन गुन्हे, चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे, एमआयडीसी भोसरी, दिघी, तळेगाव दाभाडे, चाकण तसेच गंगाखेड (परभणी) या पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक, असे सोनसाखळी चोरीचे गुन्हे, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी एक गुन्हा व वाहन चोरीचे दोन गुन्हे, असे एकूण १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी खान हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे दरोडा व जबरी चोरीचे २२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी इराणी याच्याविरोधात पुणे शहर व ग्रामीण पोलिसांकडे जबरी चोरी व वाहन चोरीचे नऊ गुन्हे दाखल आहेत


Back to top button
Don`t copy text!